शेतकऱ्यांची चिंता वाढली; पाच दिवसांच्या रिपरिपीने मूग, सोयाबीनचे वाटोळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 07:21 PM2020-08-18T19:21:44+5:302020-08-18T19:23:23+5:30
जिल्ह्यात एक आठवड्यापासून पावसाचीरिपरिप सुरू आहे़
नांदेड : जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या रिपरिपीने हातातोंडाशी आलेले मुगाचे पीक वाया गेले असून सोयाबीन पीकही पिवळे पडत असल्याने शेतकरी चिंतित आहेत़
जिल्ह्यात एक आठवड्यापासून पावसाचीरिपरिप सुरू आहे़ तर मागील तीन दिवसांपासून काही ठिकाणी संततधार सुरू आहे़ त्यामुळे हिमायतनगर, किनवट, भोकर, माहूर या तालुक्यांतील नद्यांना पूर आला आहे़ काही ठिकाणी पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे़ सतत सुरू असलेल्या या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान केले आहे़ सुरूवातीला झालेल्या पोषक पावसामुळे यंदा मूग, सोयाबीनचे पिके जोमात आली होती़
मुगाच्या शेंगा आता काढणीला आल्या होत्या़ मात्र ऐन वेळेला पावसाने हजेरी लावल्याने मुगाच्या शेंगा काळ्या पडल्या आहेत़ तर सोयाबीनचे पीकही पिवळे पडले आहे़ त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे़ यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची पेरणी केली होती़ मात्र, आता मूग व सोयाबीन ही दोन्ही पिके सततच्या पावसाने धोक्यात आली आहेत़ मुगाच्या शेंगांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़