नाफेडच्या ग्रेडरला कृषी उत्पन्न बाजार समितीत कोंडले , धर्माबाद नाफेड खरेदी केंद्रावर शेतक-यांचा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 11:38 AM2017-11-02T11:38:22+5:302017-11-02T11:41:29+5:30
शेतक-यांनी नाफेडचे ग्रेडर पी. एस. हंपोले यांच्या मनमानी कारभारला कंटाळून बुधवारी (दि.१) धमार्बाद कृषी उत्पन्न बाजार समितीत कोंडून बाहेरून कुलूप ठोकले.
नांदेड : धर्माबाद येथे शासकीय नाफेडद्वारा उडीद खरेदी करीत असलेल्या केंद्रावर जाचक अटी लावून आलेले चांगल्या प्रतीचे उडीद परत करत असल्याने शेतक-यांनी नाफेडचे ग्रेडर पी. एस. हंपोले यांच्या मनमानी कारभारला कंटाळून बुधवारी (दि.१) धमार्बाद कृषी उत्पन्न बाजार समितीत कोंडून बाहेरून कुलूप ठोकले. यावेळी सामानही बाहेर फेकून देण्यात आले़
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नाफेडमार्फत उडीद खरेदी केंद्राचा १२ आॅक्टोबर रोजी प्रारंभ झाला. एकूण १२०० शेतक-यांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी १२ शेतक-यांचा माल उतरून केवळ नाफेडने एक महिन्यात पाच शेतक-यांचे म्हणजेच ४० क्विंटलच उडीद खरेदी केले. येथील नाफेडने जाचक अटी लावून अनेक शेतक-यांचे आणलेले उडीद परत केले आहेत. काळा उडीदमध्ये केवळ थोडे फार लाल उडीद असलेले परत केले जात आहे़ थोडीफार माती, कचरा असला की परत केले जात आहे़ माऊचर डिजिटल मशीनमध्ये १२ टक्क्यांच्या वर केवळ पॉईट जास्त असले की, माल परत केला जात आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. माऊचर डिजिटल मशीनमध्ये फरक असून दोन तीन वेळेस वजन केले तर आकडे अलग अलग पडत आहेत, अशी शेतक-यांची तक्रार आहे.
ब्रोकनमध्ये तीन टक्के, खराबमध्ये तीन टक्के, अॅडमीचरमध्ये तीन टक्के, माऊचरमध्ये बारा टक्के असे नियम अटी लावून माल खरेदी केला जात आहे. माल वाळून आणा, कचरा, माती, लालमध्ये काळे, काळे उडदात लाल मिक्स आणू नये अशा अटी लावून शेतकºयांचा माल परत केला जात आहे. एवढे करूनही येथील ग्रेडर मनमानी करून शेतक-यांना त्रास देत असल्याचा आरोप शेतकºयांचा आहे. वाहनाचे भाडे, माल उतरविण्याचे पैसे शेतकºयांनाच द्यावे लागत आहे़
शेतक-यांनी संतापून सामान,टेबल फेकून दिले. ग्रेडरची येथून बदली करावी व नियम अटी न लावता शेतक-यांचा माल घेण्यात यावा अन्यथा दोन दिवसांत नाफेड केंद्र बंद करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने ग्रेडरला कृषी उत्पन्न बाजार समितीत कोंडून बाहेरून कुलूप ठोकले. ही घटना पोलिसांना कळताच पोलिसांनी कुलूप काढून ग्रेडरला बाहेर काढले.
तीन चार दिवसाला हेलपाटे मारावे लागत असूनही ग्रेडर आडमुठे धोरण ठेवत असल्याने संतप्त शेतकरी नाफेड ग्रेडर पी.एस. हंपोले यांना खरेदी केंद्रावर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र पोतगंटीवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेशराव पाटील करखेलीकर, शिवसेना तालुकाप्रमुख गणेश गिरी, छावा तालुकाध्यक्ष शिवराज पाटील चोळाखेकर, भाजपाचे तालुका सरचिटणीस गोविंद रामोड, शेतकरी मधुकर पाटील बन्नाळीकर आदी शेकडो शेतक-यांनी जाऊन धारेवर धरले.