कोथळा येथिल कोल्हापुरी बंधारा फुटल्याने शेतकरी दुहेरी संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 05:20 PM2019-11-18T17:20:02+5:302019-11-18T17:22:08+5:30
परतीच्या पावसाने झालेले नुकसान आणि आता रब्बीची मदार असलेल्या पाण्याचा अपव्यय झाल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
हदगाव : पैनगंगा नदीवर कोथळा गावाजवळ कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आला आहे. आज दुपारी १२ वाजता या बंधाऱ्याच्या भिंतीला मोठे भगदाड पडल्याने यातून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. हदगाव शहरासह सात ते आठ गावांचा पाणीपुरवठा व सिंचनाची व्यवस्था या बंधाऱ्याच्या पाण्यावर होते. परतीच्या पावसाने झालेले नुकसान आणि आता रब्बीची मदार असलेल्या पाण्याचा अपव्यय झाल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
मराठवाडा-विदर्भ सीमेवरून पैनगंगा वाहते आजुबाजूच्या गावांना व हदगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्यासाठी या नदीवर कोथळा गावाजवळ कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आला आहे. हदगाव गोजेगाव वाकोडा कोथळा संगमचिंचोली मार्लेगाव लिमगव्हाण इत्यादी गावांचा पाणीपुरवठा व शेतीसाठी सिंचनाची व्यवस्था करण्यात आली आहे. परतीच्या पावसाचा मुक्काम यंदा वाढल्यामुळे खरीप हंगाम हातचा गेला नदीकाठच्या गावांना तर मोठा फटका बसला.त्यामुळे आता शेतकऱ्यांची मदार रब्बी हंगामावरच आहे. परंतु साठलेले पाणी केवळ दुरुस्तीअभावी वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांत संताप आहे
आज दुपारी १२ वाजता बंधाऱ्याला अचानक भगदाड पडल्याने त्यातून लाखों लिटर पाणी वाया जात आहे. याची माहिती नांदेड येथील लघु पाटबंधारे विभागाला देण्यात आली आहे. परंतु, अद्याप तरी कोणी दुरुस्ती साठी आलेले नाही गतवर्षी ऐन उन्हाळ्यात हा बंधारा फुटला होता पाणी. टंचाईच्या झळा नागरीकांना सहन कराव्या लागल्या होत्या. त्यानंतर नगरपरिषदने काम करुन पाणी पुरवठा सुरळीत केला होता.
लवकरच दुरुस्तीचे काम करू
अवकाळी पावसामुळे बंधाऱ्याकडे जाणारा रस्ता खचला आहे. त्यामुळे दुरुस्तीसाठीच्या आवश्यक साहित्यांची वाहतूक करण्यास अडथळा निर्माण होतो. रस्ता सुरळीत झाल्यास लघु पाटबंधारे स्थानिक स्रर विभागाकडून काम पूर्ण करण्यात येणार आहे.
- ज्योती राठोड, नगराध्यक्षा