रात्रीच्या भारनियमनाचा फटका; शेतकऱ्यांना स्वत:चा जीव धोक्यात घालून पिकांना द्यावे लागतेय पाणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 06:24 PM2020-11-27T18:24:21+5:302020-11-27T18:25:46+5:30
रात्रीला भिजवणीसाठी गेलेल्या शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्याच्याही घटना
नांदेड : नांदेड- शेतकऱ्यांकडून सध्या हिवाळ बागायत पीकांना पाणी देण्याची लगबग सध्या सुरु आहे. परंतू शासनाकडून वेगवेगळ्या पाळीमध्ये वीज पुरवठा केला जात असल्याने सिंचनासाठी शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. शेतीला दिवसा वीज पुरवठा केला जात नसल्याने शेतकऱ्यांना स्वत:चा जीव धोक्यात घालून रात्रीच्या वेळी जागरण करुन पीकां पाणी द्यावे लागत आहे.
यंदा मुबलक प्रमाणात पावसाळा झाल्याने नांदेड जिल्ह्यात हरभरा, गहू पीकांचा पेरा वाढला आहे. त्याच बरोबर ऊस आणि केळीची लागवडही वाढली आहे. या पीकांना पाणी देण्यासाठी महावितरणकडून दिल्या जाणाऱ्या वेळेनुसारच नियोजन करावे लागत आहे. रात्रीच्या वेळी जंगल जनावरे तसेच शाॅक लागून अपघात होणे अशा घटना घडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी २४ तास वीज पुरवठा करण्याची मागणी विविध शेतकरी संघटनांनी केली आहे.
रात्रीचे भारनियमन जीवघेणे
दिवाळीनंतर गहू, हरभरा, हळद, ऊस, केळी यासह विविध पीकांना पाणी देण्याचे नियोजन शेतकऱ्यांकडून केेले जाते. रात्रीच्या वेळी जास्त दाबाने विद्युत पुरवठा होत असल्याने बहुतांश शेतकरी रात्रीच सिंचनाचे नियोजन करतात परंतू रात्रीच्या वेळी जंगली जनावरे, रान डुकर, साप अशा प्राण्यांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. त्यातच ना दुरुस्त मोटारी, काही बिघाड झाल्यास रात्रीच्या वेळी विहीरीत उतरणे अशा प्रकारामुळे अपघात घडून शेतकऱ्यांना जीव गमवावा लागतो. अशा घटना घडलेल्या आहेत.
पाऊस चांगला झाल्याने मुबलक पाणी
नांदेड जिल्ह्यात यंदा सरासरीच्या १०५ टक्के पाऊस झाल्याने सर्वच धरणे, प्रकल्प तुडूंब भरले आहेत. नांदेड जिल्ह्याची मदार असलेल्या येलदरी, इसापूर, विष्णुपूरी, मानार यासह लघु व मध्यम प्रकल्पात मुबलक प्रमाणात पाणी साठा झाला आहे. त्याचा फायदा शेतीसाठी होणार आहे.इसापूर धरणातून पाणी पाळ्या देण्याचे नियाेजन कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आले आहे. त्यानूसार सिंचनासाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे. याबरोबरच महावितरणणे देखील पाणी पाळीच्या वेळेज वीज पुरवठा सुरुळीत ठेवण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे.
नांदेड जिल्ह्यात शिफ्टवाईज वीज पुरवठा करण्यात येतो. एकाच वेळी वीजेचा वापर अधिक झाल्याने दाब येवून वीज पुरवठा खंडीत होतो. त्यामुळे आठ-आठ तासांची वीज दिली जाते. भविष्यात सौरऊर्जेचा वापर करुन वीज पुरवठा करण्याचे नियोजन आहे.
- संतोष वहाणे, अधीक्षक अभियंता, नांदेड
महावितरणकडून शेतकऱ्यांना रात्री ११ नंतर अथवा पहाटेच्यावेळी वीज दिली जाते. या वेळेतही वीजेचा दाब मुबलक प्रमाणात नसल्याने मोटारी पाणी ओढत नाहीत. रात्रीच्या वेळी जंगली जनावरांचा सामना करावा लागतो. दिवसा वीज देणे गरजेचे आहे.
- परमेश्वर कदम, शेतकरी