शेतकऱ्यांनो, आता आणखी ‘रिस्क’ नको;बाजारात कापसाला उच्चांकी भाव,विक्रीस आणण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2022 05:31 PM2022-02-03T17:31:24+5:302022-02-03T17:32:20+5:30

सध्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात रुई गाठींची प्रचंड मागणी आहे. त्यामुळे कापसाच्या भावात कमालीची तेजी आहे.

Farmers, no more 'risk'; High prices for cotton in the market, appeal to sell | शेतकऱ्यांनो, आता आणखी ‘रिस्क’ नको;बाजारात कापसाला उच्चांकी भाव,विक्रीस आणण्याचे आवाहन

शेतकऱ्यांनो, आता आणखी ‘रिस्क’ नको;बाजारात कापसाला उच्चांकी भाव,विक्रीस आणण्याचे आवाहन

Next

नांदेड : चांगल्या दर्जाच्या कापसाला सध्या १० हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळतो आहे. हा भाव उच्चांकी ठरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता आणखी जोखीम (रिस्क) न पत्करता आपला कापूस बाजारात विक्रीसाठी आणावा, असे सल्लावजा आवाहन कॉटन काॅर्पोरेशन ऑफ इंडियाने (सीसीआय) केले आहे.

सीसीआयचे मुख्य महाव्यवस्थापक एस. के. पाणिग्रही (मुंबई) यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, सध्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात रुई गाठींची प्रचंड मागणी आहे. त्यामुळे कापसाच्या भावात कमालीची तेजी आहे. सध्या साडेदहा हजारांपर्यंत भाव गेला आहे; परंतु हा भाव उच्चांकी वाटतो आहे. यापेक्षा आणखी भाव वाढेल अशी शक्यता नाही. एखादवेळी वाढलाच तर तो किंचित स्वरूपाचा राहील. यापेक्षा अधिक भाव दिला गेल्यास कापड मिल मालकांचे नुकसान होण्याचा धोका आहे. त्यामुळे आणखी भाव वाढणार नाही. मात्र, एखादवेळी कमी होण्याची शक्यता आहे. भाव कमी झाला तरी हमी भावापेक्षा तो कितीतरी हजारांनी अधिक असल्याने शेतकऱ्यांचे निश्चितच नुकसान होणार नाही. ते पाहता शेतकऱ्यांनी आणखी दरवाढीची प्रतीक्षा न करता आणि कोणतीही जोखीम न पत्करता आपला कापूस बाजारात विक्रीसाठी आणावा, असा सल्ला सीसीआयने दिला आहे.

आणखी ४५ टक्के कापूस घरातच
आतापर्यंत ५५ टक्के कापूस विक्रीसाठी आला आहे. आणखी ४५ टक्के कापूस शेतकऱ्यांकडे आहे. यावर्षी राज्यात ४ कोटी क्विंटल कापूस उत्पादनाची अपेक्षा आहे. त्यापैकी अडीच कोटी क्विंटल कापूस बाजारात आला आहे. आणखी दीड कोटी क्विंटल कापसाची विक्री होणे बाकी आहे. या खरीप हंगामात उशिरा पेरणी झाल्याने कापसाचा हंगाम एप्रिलअखेरपर्यंत सुरू राहील असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.

कापसाचा पेरा २० टक्क्यांनी वाढणार
गेल्या हंगामात सोयाबीनसह इतर पिकांनीही धोका दिला आहे. त्याला निसर्ग व किडींचे आक्रमण कारणीभूत ठरले आहे. अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी कापसाची कमी लागवड केली आणि नेमका याच वर्षी कापसाला दहा हजारांच्या पुढे भाव मिळाला. ते पाहता पुढील हंगामात राज्यात कापसाचा पेरा किमान २० टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज सीसीआयचे मुख्य महाव्यवस्थापक एस. के. पाणिग्रही यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Farmers, no more 'risk'; High prices for cotton in the market, appeal to sell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.