पीक विम्यासाठी शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2021 05:14 PM2021-11-17T17:14:32+5:302021-11-17T17:32:27+5:30
शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर मदत देण्यापेक्षा त्याआधीच योग्यवेळी मदत करावी
हदगाव (नांदेड) : गतवर्षीचा खरीप हंगामाचा पिकविमा कंपनीने लेखी आश्वासनानंतरही न दिल्याने शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रल्हाद पाटील हडसणीकर यांनी आज दुपारी तहसील कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. परंतु पोलीस निरीक्षक विजय डोंगरे यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.
सन २०२०-२१ या वर्षी चा खरीप हंगाम ऐन काढणीच्या वेळेवर अतिवृष्टी झाल्याने खंगाम हातचा गेला पण शेतकऱ्यांनी भरलेला पिकविम्याचा परतावा मिळाला नाही. तो मिळावा यासाठी तालुक्यातील राजकीय नेते, शेतकरी संघटना यांनी रस्तारोको, आंदोलन जेलभरो आंदोलन केले होते. त्यावेळी तहसीलदार जिवराज डापकर व कृषी अधिकारी अविनाश रणवीर यांच्या मध्यस्थीने संबंधित कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बोलणी झाली होती. त्यांनी नोव्हेंबर महिन्यात पिकविमा देण्याचे आश्वासन दिले होते पण ते हवेतच विरले.
यामुळे प्रकाराने संतप्त झालेल्या प्रल्हाद पाटील हडसणीकर या शेतकऱ्याने आज तहसील कार्यालयात शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. परंतु, यावेळी कर्तव्यावर असलेले पोलीस निरीक्षक विजय डोंगरे यांनी तत्काळ प्रल्हाद पाटील यांच्या हातातील पेट्रोलची बॉटल खाली पाडली. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर मदत देण्यापेक्षा त्याआधीच योग्यवेळी मदत केली तर अनेक शेतकऱ्यांचे जीव वाचतील अशा संतप्त भावना यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.