शेतकरी पुत्राचा सातासमुद्रापार डंका, एक लाख तास आयुष्य असलेल्या एलईडीचे मिळवले पेटंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 07:14 PM2021-06-09T19:14:26+5:302021-06-09T19:19:25+5:30
अभिजीत कदम याने व्हाईट एलईडीवर नवीन मटेरियल शोधले आहे आणि त्यावर वयाच्या अवघ्या २६व्या वर्षी दोन पेटंटसाठी अनुदान मिळविले आहे.
हदगाव (जि. नांदेड) : तालुक्यातील साप्ती येथील शेतकऱ्याच्या एका मुलाने आपल्या नावाचा डंका सातासमुद्रापार वाजविला आहे. त्याने एक लाख तास आयुष्य असलेल्या व्हाईट एलईडी बल्बचे पेेटंट मिळवले असून, आतापर्यंत त्याला दोन पेटंटसाठी आंतरराष्ट्रीय अनुदानसुद्धा मिळाले आहे. जपानच्या तीन वैज्ञानिकांना ज्या संशोधनासाठी नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते, त्यांच्याच कार्याचे पुढील संशोधन करून २०२० मध्ये व्हाईट एलईडीच्या ऑस्ट्रेलियन पेटंटवर आंतरराष्ट्रीय अनुदान मिळवण्याचे महान कार्य साप्ती येथील अभिजीत रमेशराव कदम या शेतकऱ्याच्या मुलाने केले. त्याने लॉकडाऊनच्या काळातही आपले संशोधन कार्य सुरूच ठेवून अनोखा उपक्रम राबविला.
२०१४ मध्ये जपानचे तीन वैज्ञानिक इशामू अंकासाकी, हिरोशी अमानो आणि शुजी नाकापोरा या तीन वैज्ञानिकांना ब्ल्यू एलईडीवर जगातील सर्वोच्च नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर अभिजीत कदम याने व्हाईट एलईडीवर नवीन मटेरियल शोधले आहे आणि त्यावर वयाच्या अवघ्या २६व्या वर्षी दोन पेटंटसाठी अनुदान मिळविले आहे. एलईडी हा आजच्या काळात ऊर्जा बचतीसाठी खूप महत्त्वाची प्रकाश व्यवस्था असून, त्याचे आयुष्यमान एक लाख तास आहे. तो सध्या प्रचलीत असलेल्या सीएफएल बल्बच्या पाचपट अधिक वीज बचत करून अधिक प्रकाश देतो. या बाबींचा सामान्यांना फायदा होईल, असे अभिजीत कदम याने सांगितले.
अवघ्या १४ महिन्यांत १६ शोधनिबंध
अभिजीत कदम यांनी नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील डॉ. संजय बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली आचार्य पदवीचे प्रशिक्षण घेत आहे. अवघ्या १४ महिन्यात १६ शोधनिबंध आंतरराष्ट्रीय जरनलमध्ये त्याने प्रकाशित केले असून, ती पेटंट प्रकाशित केले आहे. यातील दोन पेटंटला आंतरराष्ट्रीय अनुदान मिळाले आहे. अभिजीत कदम यांचे १३ बुक ऑफ चाप्टर विविध आंतरराष्ट्रीय पुस्तकांमध्ये प्रकाशनासाठी अभ्यासाधीन असून, दोन बुक चाप्टर नाना प्रकाशनाच्या आंतरराष्ट्रीय पुस्तकात प्रकाशित झाले आहेत.