उद्धव ठाकरेंसमोर शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 06:49 PM2019-11-05T18:49:11+5:302019-11-05T18:51:40+5:30
किरोडा शिवारातील अतिवृष्टी बाधित नुकसानीची उद्धव ठाकरे यांच्याकडून पाहणी व शेतकऱ्यांशी संवाद
लोहा : परतीच्या पावसाने अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. प्रशासनाकडून प्रत्येक गाव शिवारातील अतिवृष्टी बाधित पिकांचे पहाणी व पंचनामे सुरू केले. तर अनेक प्रमुख पक्षातील पुढाऱ्यांनी थेट बांधावर जात पिकांच्या नुकसानीची पहाणी केली. मंगळवारी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तालुक्यातील तीन गाव शिवारातील पिकांची पहाणी केली. यावेळी उद्धव ठाकरेंसमोर ओल्या दुष्काळाची व्यथा मांडताना शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटल्याचा पाहायला मिळाला. ठाकरे यांनी आम्ही तुमच्या सोबत आहोत काळजी करू नका असा धीर दिला.
यंदा परतीच्या पावसाने सर्वत्र कहर केला. क्षमतेपेक्षा अधिक पाऊस अतिवृष्टी ने शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे संपूर्णतः नुकसान झाले. सोयाबीन, ज्वारी व कपाशीला कोंब फुटून पिकं हातची गेली. राज्यभर पिकांची पहाणी विविध पक्षातील नेतेमंडळीनी सुरू केली. मंगळवारी सकाळी सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी खा.चंद्रकांत खैरे, आ. एकनाथ शिंदे, आ. राहुल पाटील, माजी मंत्री सुभाष देसाई, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, आ. संतोष बांगर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, उपविभागीय अधिकारी एस.एस. बोरगावकर आदींसह लोहा तालुक्यातील अतिवृष्टी बाधित गावांच्या शिवारातील पिकांची पहाणी केली. त्यामध्ये जनापुरी, आंबेसंगवी व किरोडा येथील थेट बांधावर जात शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी ठाकरे यांनी, तुम्ही हताश व निराश होऊ नका आम्ही तुमच्या सोबत आहोत असा धीर देत मनात आत्महत्येचा वाईट विचारसुद्धा आणायचा नाही असे वचन द्या अशी भावनिक साद घातली.
...अन शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला
उद्धव ठाकरे किरोडा शिवारात नुकसानीची पाहणी करत होते. यावेळी या भागातील ६० वर्षीय शेतकरी मारुती जाधव ठाकरे यांना माहिती देत असताना त्यांना अश्रू अनावर झाले. ते पाहून स्वतः उद्धव ठाकरेसुद्धा भावुक झाले. यानंतर प्रशासनातील अधिकारी व शेतकऱ्यासोबत त्यांनी संवाद साधला.