शेतकर्यांच्या पाढर्या सोन्याला कवडीमोल किंमत
By admin | Published: December 22, 2014 03:01 PM2014-12-22T15:01:45+5:302014-12-22T15:01:45+5:30
अत्यल्प पर्जन्यमानामुळे यंदा जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट आहे. विपरीत परिस्थितीचा सामना करत वाढविलेल्या कापसाची धर्माबाद तालुक्यात कवडीमोल दराने खरेदी केली जात आहे.
लक्ष्मण तुरेराव /धर्माबाद
अत्यल्प पर्जन्यमानामुळे यंदा जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट आहे. विपरीत परिस्थितीचा सामना करत वाढविलेल्या कापसाची धर्माबाद तालुक्यात कवडीमोल दराने खरेदी केली जात आहे.
धर्माबाद तालुक्यात फार कमी पाऊस झाल्याने शेतकर्यांचे कंबरडे मोडले. एकदा, दोनदा नव्हे तर तीबार पेरणी शेतकर्यांनी केली. पण जेवढी मशागत शेतकर्यांनी शेतात केली तेवढा खर्च निघेनासा झाला आहे. पाणी कमी पडल्याने पिकाच्या उत्पन्नात घट झाली. त्यात उत्पन्न घसरणीमध्येही शेतकर्यांच्या पांढर्या सोन्याला शासनाने कवडीमोल किंमत तर देतच आहे उलट येथील व्यापारी, दलाल त्यापेक्षा कमी म्हणजे शासनाच्या हमी भावापेक्षाही कमी किंमत देवून शेतकर्यांची लुट करीत आहेत. निसर्गाच्या कोपाने शेतकर्यांचे कंबरडे मोडले. याला दिलासा म्हणून शासनाने उत्पन्न घसरणमध्ये कापसाला जास्त भाव द्यायला पाहिजे, असे शेतकर्यांचे म्हणणे आहे.
तालुक्यात मनजीत कॉटन जिनिंग व एल.बी. पांडे कॉटन जिनिंग असे दोन खाजगी पणन कापूस खरेदी संघ आहेत. मनजीत कॉटन जिनिंगमध्ये आतापर्यंत २५ हजार क्विंटल कापसाची आवक झाली तर एल.बी. कॉटन जिनिंगमध्ये ३0 हजार क्विंटल कापसाची आवक झाली. या दोन्ही जिनिंगमध्ये शासनाच्या हमी भावापेक्षा कमी भाव दिला जात आहे. शासनाचा कापूस भाव प्रतिक्विंटल ४0५0 असून जिनिंगमध्ये ३९५0 रुपये, ३९00 रुपये, कधीकधी ४ हजार रुपये असे शेतकर्यांच्या कापसाला भाव देतात. दुसरीकडे तर खाजगी व्यापारी-दलाल, भुसारवाले हे तर भयानक शेतकर्यांची लुट करतात.
शेतकर्यांनी पूर्वीच पैसे शेतात टाकल्यामुळे आता खर्चाला पैसे नसल्याने नाईलाजाने आहे ते एक-दोन क्विंटल कापूस व्यापारी-दलाल, भुसारवाल्यांना कमी किंमतीत देवून टाकतात. दलाल, व्यापारी गावात जावून शेतकर्यांचा कापूस खरेदी करतात. जाण्यायेण्याचा खर्च वाचेल म्हणून शेतकरी ३८00, ३९00, ३९५0 प्रतिक्विंटल भावाने देवून मोकळे होतात. कापूस शेतकर्यांकडून खरेदी केल्यानंतर दलाल, व्यापारी पाणी टाकून परराज्यात विक्री करतात. मध्यप्रदेश, गुजरात, आंध्रप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आदी राज्यात टेम्पो, ट्रकमध्ये भरून आपली चांदी करून घेतात. शेतकर्यांच्या पांढर्या सोन्याला कवडीमोल किंमत देवून दलाल, व्यापारी आपली पोळी भाजून घेत आहेत. वर्षभर शेतात राबराब राबून शेतकर्यांच्या हाताला खर्च निघत निघत नाही पण मोसमात केवळ दोन महिन्यात दलाल व्यापारी पाण्यावर पैसा कमवितात. पण शासनाला शेतकर्यांचे अश्रू दिसत नाही, असे शेतकर्यांकडून ऐकण्यात येते.
बहुतांश व्यापारी-दलालाकडे कापूस खरेदी करण्याचा परवाना नाही की कधी कृउबा समितीकडे कर भरला नाही. ज्याकडे आहे ते कमी खरेदी केलेले दाखवितात. याकडे कोणीच लक्ष देत नाहीत. त्यामुळे कृउबास अंतर्गत असलेल्या जिनिंगमध्ये कापसाची आवक कमी प्रमाणात दिसत आहे.
----------------
खाजगी दलाल, व्यापारी, कृउबा समितीला कमी खरेदी दाखवित असल्याने कृउबा समितीला तोटा होत आहे. एका ट्रकला केवळ ६३0 रुपयांची पावती फाडली जाते. एक-दोन ट्रकची पावती फाडली जाते, बाकीची नोंदच नसते. एका शेतकर्याकडून लुट तर दुसरीकडे कृउबा समितीला कर भरला जात नाही., असे खाजगी दलालाची नित्यच असते. पण याकडे दुर्लक्षच होत आहे.