कौटुंबिक कलहातून पिता-पुत्राचा नदीत आत्महत्येचा प्रयत्न; पिता वाचला तर मुलगा बुडाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 05:05 PM2020-03-11T17:05:49+5:302020-03-11T17:06:17+5:30
मुलगा बुडाला असून त्याचा शोध घेणे सुरु आहे.
उमरी : तालुक्यातील ईज्जतगाव येथे पिता - पुत्राने नांदेडजवळ आमदुरा येथील आसना नदीच्या पुलावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. यातील पित्याला वाचविण्यात यश आले असून मुलगा बुडाला असून त्याचा शोध घेणे सुरु आहे. ही घटना मंगळवारी ( दि. १० ) सकाळी घडली.
नदीपात्रात दोघांनी उड्या मारल्याचे पाहून लगेच त्यांना वाचविण्यासाठी आजूबाजूला असलेल्या लोकांनी पाण्यात धाव घेतली. यावेळी शेषेराव पांडे (वडील ) यांना पोहता येत असल्याने ते वाचले. मात्र मुलगा मारोती पांडे हा पाण्यात बेपत्ता झाला असून त्याचा शोध घेणे सुरु आहे. दोघेही उमरी तालुक्यातील ईज्जतगाव येथील रहिवासी आहेत. या मागे कौटुंबिक कलहाचे कारण असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
दरम्यान, आज दुसऱ्या दिवशी सकाळपासून ईज्जतगाव व आमदुरा येथील काही नागरिक व मच्छीमारांच्या मदतीने नदीमध्ये मोरोती याचा शोध घेणे सुरु आहे. दुपारी नातेवाईकांनी नांदेड येथे ग्रामीण पोलिस स्टेशन गाठून माहिती दिली. यानंतर पोलीस व नांदेड मनपाच्या बचाव पथकाच्या मदतीने मारुती पांडेचा नदी पात्रात शोध घेण्यात येणार आहे.