वडील नसलेल्या मुलीने डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले, टारगटांनी तिचे जगणे अवघड केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2021 07:40 PM2021-10-20T19:40:24+5:302021-10-20T19:43:56+5:30
दहावीत चांगल्या गुणांनी पास होऊन मेडिकलला प्रवेश लागावा म्हणून पीडित तरुणी तयारी करीत होती.
नांदेड : पित्याचे छत्र हरविल्यानंतर आई आणि भाऊ काबाडकष्ट करून मुलीला डॉक्टर बनविण्याचे स्वप्न पाहत असताना, काही टारगटांकडून मात्र या मुलीला सोशल मीडियावर अश्लील मेसेज पाठवून मानसिक त्रास देण्यात आला. गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. अनेकवेळा मुलीने ठाणेही गाठले. अखेर नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा नोंद झाला. आता सायबर सेलच्या माध्यमातून या चिडीमारांचा शोध घेण्यात येत आहे.
दहावीत चांगल्या गुणांनी पास होऊन मेडिकलला प्रवेश लागावा म्हणून पीडित तरुणी तयारी करीत होती. त्यातच मार्च महिन्यात पित्याचे छत्र हरविले. परंतु त्यानंतरही हिमंत न सोडता आई आणि भावाने काबाडकष्ट करून मुलीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा निश्चय केला. ऑनलाईन अभ्यासासाठी आईने मुलीला आपला मोबाईल दिला. मुलीने सोशल मीडियावर आपले अकाऊंट उघडले. परंतु त्यानंतर त्यावर वेगवेगळ्या आयडीवरून अश्लील मेसेज येण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला तरुणीने दुर्लक्ष केले; परंतु नंतर मुलीचे फोटो स्टेटसला ठेवून त्यावर अश्लील मजकूर लिहिण्यात आला. मुलीच्या भावाने या सर्व अश्लील मेसेजचे पुरावे जमा केले. हे सर्व पुरावे घेवून पिडीत परिवार पोलीस ठाण्यात गेला होता. त्यानंतर पोलिसांकडे हे पुरावे दिले. परंतु सुरुवातीला तपासावर असलेल्या या प्रकरणात आता गुन्हा नोंद झाला. आता सायबर सेलकडून चिडीमारांचा शोध घेण्यात येत आहे. परंतु झालेल्या या प्रकारामुळे मुलीचे अन् तिच्या आईचे मानसिक खच्चीकरण झाले आहे.
आरोपी ओळखीतीलच असण्याची शक्यता
तरुणीला त्रास देणारे आरोपी हे ओळखीतीलच असल्याची शक्यता आहे. पोलिसांनी सुरुवातीला कारवाई न केल्यामुळे पिडीत तरुणीने आईसह नगरसेवक राजू काळे यांना भेटून आपली व्यथा मांडली होती.