नांदेडात इंधन दरवाढीविरोधात संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 12:18 AM2018-02-03T00:18:58+5:302018-02-03T00:23:54+5:30
पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य होरपळून निघत असून शासनाकडून मात्र केवळ आश्वासनांचे गाजर दाखविण्यात येत आहे़ सर्वसामान्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी बैलगाडी, सायकल मोर्चा काढण्यात आला़ शेकडो बैलगाड्या आणि हजारो सायकलींवर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेल्या मोर्चाने शहर दणाणले होते़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य होरपळून निघत असून शासनाकडून मात्र केवळ आश्वासनांचे गाजर दाखविण्यात येत आहे़ सर्वसामान्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी बैलगाडी, सायकल मोर्चा काढण्यात आला़ शेकडो बैलगाड्या आणि हजारो सायकलींवर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेल्या मोर्चाने शहर दणाणले होते़
माजी मुख्यमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष खा़ अशोकराव चव्हाण यांच्या सूचनेनुसार काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते़ नवीन मोंढा परिसरात सकाळपासून जिल्हाभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती़ यावेळी ग्रामीण भागातून अनेक जण बैलगाड्यांवर मोर्चास्थळी पोहोचले होते़ दुपारी बारा वाजेच्या सुमारास माजी मंत्री आ़ डी़ पी़ सावंत, महानगराध्यक्ष आ़अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांच्या नेतृत्वात नवा मोंढा परिसरातून मोर्चाला सुरुवात झाली़ मोर्चाचे एक टोक आयटीआय चौक तर शेवटचे टोक मोंढा कमानीजवळ होते़ आयटीआय, शिवाजीनगर, ओव्हरब्रीज, कलामंदिर, वजिराबाद चौक, शिवाजी पुतळामार्गे दुपारी एक वाजेच्या सुमारास हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला़ मोर्चामध्ये शंभरावर बैलगाड्या, घोडे आणि सायकलींवर काँग्रेस कार्यकर्ते स्वार झाले होते़ यावेळी केंद्र आणि राज्य शासनाच्या विरोधात केलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता़ या ठिकाणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिका-यांना निवेदन दिले़
मोर्चात आ़ वसंतराव चव्हाण, जि़प़अध्यक्षा शांताबाई जवळगावकर, महापौर शीलाताई भवरे, नामदेवराव केशवे, गणपतराव तिडके, हणमंत पाटील बेटमोगरेकर, लियाकतअली अन्सारी, बी़आरक़दम, रावसाहेब अंतापूरकर, माधवराव पाटील जवळगावकर, रोहिदास चव्हाण, ईश्वरराव भोसीकर, डॉ़श्याम तेलंग, अब्दुल सत्तार, किशोर स्वामी, किशोर भवरे, शैलजा स्वामी, विनय गिरडे पाटील, संगीताताई तुप्पेकर, प्रवक्ते संतोष पांडागळे, अलकाताई शहाणे, आनंद चव्हाण, शफी अहेमद कुरेशी, मसूद अहेमद खान, माधवराव मिसाळे, शीला निखाते, प्रकाश भोसीकर, मंगलाताई धुळेकर, मंगलाताई निमकर, तिरुपती कोंढेकर, विठ्ठल पावडे, गफार खान, पुष्पाताई शर्मा, मीडिया सेलचे प्रमुख अमित काबरा, कविता कळसकर, दुष्यंत सोनाळे, किशनराव किनवटकर, बलवंतसिंघ गाडीवाले, विरेंद्रसिंघ गाडीवाले, हबीब बागवान, निलेश पावडे आदींचा सहभाग होता़
जिल्हाभरातून पदाधिकारी सहभागी
नवीन मोंढा परिसरातून निघालेल्या मोर्चासाठी सकाळी नऊ वाजेपासून मैदानावर काँग्रेस कार्यकर्त्यांचे येणे सुरु झाले होते़ सकाळी अकरा वाजेपर्यंत मोंढा मैदान काँग्रेस कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुलून गेले होते़ त्यानंतर दुपारी बारा वाजता मोर्चाला सुरुवात करण्यात आली़ रस्त्याने सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येत होती़
बैलगाड्यांनी वेधले लक्ष
पेट्रोल,डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून आता बैलगाडीतून प्रवास करण्याची वेळ सर्वसामान्यांवर येणार आहे़ इंधन दरवाढीच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसने आजच्या आंदोलनात शंभरावर बैलगाड्या आणल्या होत्या़ मोर्चात सर्वात पुढे या बैलगाड्या होत्या़ बैलगाड्या शहरातील मुख्य रस्त्यावरुन जाताना सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या़ यावेळी ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी पोळा सणाप्रमाणे बैलांना सजविले होते़ त्यांच्यावर आकर्षक झुली चढविण्यात आल्या होत्या़
शासनाने पेट्रोल ८२ रुपये तर डिझेल ७० रुपये लिटर केले आहे़ सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती कमी असताना शासनाकडून इंधनामध्ये भरमसाठ वाढ केली जात आहे़ गरिबांना लुटून उद्योगपतींचे खिसे भरणारे हे सरकार आहे़ राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना डिझेल आणि पेट्रोलची भरमसाठ वाढ सर्वसामान्यांना अडचणीत आणणारी ठरणारी आहे़
-माजी मंत्री आ़डी़पी़सावंत
शासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे जनतेवर ही भाववाढ लादण्यात आली आहे़ मूठभर वर्गाच्या हिताचा विचार करुन दरवाढीचा निर्णय घेतला आहे़ अडचणीत असलेल्या शेतक-यांना अद्याप कर्जमाफी मिळाली नाही़ शेतक-यांच्या आत्महत्या रोखण्यास शासन अपयशी ठरली आहे़ अर्थसंकल्पातही सरकारने सर्वसामान्यांची निराशाच केली आहे़
-आ़ अमरनाथ राजूरकर