ढगाळ वातावरणामुळे रबी उत्पादन घटण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 04:07 PM2019-12-18T16:07:27+5:302019-12-18T16:27:30+5:30
शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक अस्मानी संकटाने हिरावून घेतले जात आहे़ यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणितच पार बिगडून गेले
पार्डी (जि़नांदेड) : अर्धापूर तालुक्याला मागील वर्षी कोणत्या ना कोणत्या नैसर्गिक संकटाला सामोरे जात आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक अस्मानी संकटाने हिरावून घेतले जात आहे़ यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणितच पार बिगडून गेले आहे. यंदा ढगाळ वातावरणामुळे रबीचे उत्पादन घटण्याचा धोका निर्माण झाला आहे़
सध्या रबी हंगामात गहू, हरभरा, ज्वारी पिकांची मोठ्या प्रमाणावर पेरणी झालेली असून पिके समाधानकारक असली तरी सततच्या ढगाळ वातावरणामुळे किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे़ यामुळेही शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार की का? या चिंतेत आहे. यावर्षी पावसाळा समाधानकारक झाल्याने शेतकरी आनंदित असताना परतीच्या पावसाने हाहाकार माजविला होता़ शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला़ खरीप हंगाम गेल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला़ यातून सावरून रबी हंगामातील पिकांची पेरणी केली़ मात्र मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे पुन्हा नैसर्गिक आपत्ती आली आहे़ ढगाळ वातावरणामुळे गहू, हरभरा, आंबा व तुरीला फटका बसत आहे़ तर केळी व ज्वारी करिता पोषण वातावरण निर्माण झाले आहे.
तालुक्यात ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून तीन पाणी पाळ्या रबीकरीता मिळणार आहेत़ यामुळे शेतकऱ्यांनी रबी पिकांची पेरणी केली़ मात्र सततच ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने गव्हाची वाढ खुंटली़ तर काही शेतकरी गव्हाची पेरणी करण्याकरिता मागेपुढे पाहत आहेत हरभऱ्यावर अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे व आंब्याच्या आबेमोहर गळून जात आहे आणि तुरीच्या शेंगा अळीने फस्त केल्या जात आहेत़ यामुळे रबीच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत दिसत आहेत़
अर्धापूर तालुका इसापूर धरणाच्या लाभ क्षेत्रात येत असल्याने तालुक्यात बागायतदार शेतकरी जास्त असून नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे केळी, हळद, ऊस या पिकांसह सोयाबीन, कापूस, गहू, ज्वारी, हरभरा आणि भाजीपाला घेतला जातो. यंदा पावसाळा समाधानकारक झाल्याने नदी ,नाले ,विहीर व बोअरवेल पाण्याने भरलेली आहेत़ त्यामुळे रबीच्या क्षेत्रातही मोठी वाढ झाली आहे तसेच इसापूर धरणातून पाणी पाळ्या मिळत असल्याने कोरडवाहू शेतीही ओलायती खाली आली आहे त्यामुळेही रबीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली, मात्र मागील काही दिवसांपासून रबीसाठी पोषक वातावरण उपलब्ध होत नसल्याचे दिसून येते़