गोळीबाराच्या थराराने व्यापाऱ्यांमध्ये भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 12:28 AM2018-12-06T00:28:27+5:302018-12-06T00:30:13+5:30
शहरात गत महिनाभरात रस्त्यावर दुचाकीवरुन जाणा-या दोघांवर गोळीबार केल्याच्या घटना घडल्या आहेत़ त्यामुळे व्यापा-यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून आरोपींचीही हिंमत वाढल्याचे दिसून येत आहे़
नांदेड : शहरात गत महिनाभरात रस्त्यावर दुचाकीवरुन जाणा-या दोघांवर गोळीबार केल्याच्या घटना घडल्या आहेत़ त्यामुळे व्यापा-यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून आरोपींचीही हिंमत वाढल्याचे दिसून येत आहे़
नांदेडात काही वर्षांपूर्वी गुन्हेगारांच्या अनेक टोळ्या कार्यरत होत्या़ आपआपसातील भांडणात अनेक दिग्गज गुंडांचा खात्मा झाला होता़ तर मध्यंतरी पोलिसांच्या भूमिकेमुळेही अनेकांनी गुन्हेगारी विश्वातून काढता पाय घेतला होता़ त्यामुळे गेली काही वर्षे नांदेडात गुन्हेगारीला बराच पायबंद बसला होता़ परंतु,मध्यंतरी आपआपसातील वादातून तीन ते चार जणांच्या खुनाच्या घटना घडल्या़ त्यामुळे नांदेडातील गुन्हेगारीविश्व पुन्हा एकदा ढवळून निघाले होते़
त्यात गेल्या काही महिन्यांत तर नांदेडात पिस्तुलाचा वापर सर्रासपणे होत असल्याचे अनेक घटनांवरुन उघडकीस आले आहे़ पिस्तुलातून गोळी मारुन नामवंत व्यक्तींनी आत्महत्याही केल्या आहेत़ तर वादातून व्यापा-यांवर गोळीबाराच्या घटनाही घडल्या आहेत़ काही दिवसांपूर्वीच तांडा बारचे सुरेश राठोड यांच्यावर हिंगोली गेट परिसरात दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात तिघांनी गोळीबार केला होता़ त्यावेळी राठोड यांच्या पायाला गोळी लागली होती़ त्यावेळी पोलिसांनी दोघांना अटकही केली होती़ त्यानंतर मंगळवारी रात्री बालाजी मंदिर परिसरात आशिष पाटणी या व्यापाºयावर दोघांनी गोळीबार केल्याची घटना घडली़
रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास मुख्य रस्त्यावर ही घटना घडली़ हल्लेखोरांनी यावेळी पाटणी यांच्या पायावर गोळ्या घातल्या़ हल्ल्याचे सीसीटीव्हीमध्ये चित्रीकरण झाले आहे़ परंतु, त्यावरुन आरोपी ओळखणे आणि त्यांना अटक करण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे़
मात्र गोळीबाराच्या सलग घडणा-या घटनांमुळे व्यापा-यांमध्ये भीतीचे वातावरण आहे़ पाटणी यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ प्लाटिंगच्या व्यवसायात पैशाच्या देवाणघेवाणीवरुन हा हल्ला करण्यात आला असावा, असा संशय पोलिसांना आहे़