पावसाची धास्ती; नांदेड बाजार समितीत एवढी हळद आली की मोजायला लागले दोन दिवस !
By प्रसाद आर्वीकर | Published: May 10, 2023 07:44 PM2023-05-10T19:44:42+5:302023-05-10T19:44:59+5:30
नांदेड बाजार समितीत सोमवारी विक्रमी २० हजार पोते हळदीची आवक झाली.
नांदेड : शेतात वाळण्यासाठी काढून ठेवलेली हळद अवकाळी पावसाने भिजत असून, यापुढेही पावसाची शक्यता वर्तविली आहे. सध्या उघडीप मिळाल्याने उत्पादकांनी थेट बाजारपेठेचा रस्ता धरलाय. परिणामी, नांदेड बाजार समितीत सोमवारी विक्रमी २० हजार पोते हळदीची आवक झाली. ही हळद मोजण्यासाठी चक्क दोन दिवसांचा कालावधी लागला.
नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीत मराठवाड्यातील लातूर, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ, धाराशिव या भागातूनही हळद उत्पादक माल विक्रीसाठी आणतात. सर्वसाधारणपणे या बाजार समितीत १० ते १२ हजार हळदीचे कट्टे दाखल होतात. त्यांची एकाच दिवशी मोजणीही केली जाते. दरम्यान, अवकाळी पावसाने उघडीप दिल्याने सोमवारी नांदेड बाजार समितीत हळदीची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली. एकाच दिवशी २० हजारांच्या जवळपास हळदीचे कट्टे दाखल झाले आहेत. त्यापैकी ६० वाहनांचे बिट सोमवारी होऊ शकले नाही. सकाळी दहा वाजता सुरू झालेले बिट सायंकाळी सहा वाजेपर्यंत चालले, अशी माहिती नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव साहेबराव बाऱ्हाटे आणि एम. पी. पाटील यांनी दिली.
दरम्यान, नांदेड बाजार समितीतील वाढणारी हळदीची आवक लक्षात घेऊन बाजार समिती प्रशासनाने हळद घेऊन येणाऱ्या उत्पादकांना कोणताही त्रास होऊ नये याचे नियोजन केले असून, सोमवारी ज्यांचे बिट झाले नाही त्यांचे नियोजन मंगळवारी करण्यात आले.
मंगळवारी मिळाला ९ हजारांचा दर
नांदेड बाजार समितीत मंगळवारी देखील मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. दिवसभरात ८ हजार पोते हळदीची आवक झाली. मंगळवारी झालेल्या बिटावर हळदीला ९ हजार रुपयांचा सर्वाधिक दर मिळाला असून, कमीत कमी ५५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. दिवसभरातील सरासरी दर ६५०० रुपये दर मिळाला आहे, असे बाजार समितीचे सांख्यिकी अधिकारी रवींद्र कल्याणकर यांनी सांगितले.