अपक्षांना भुईमूग,भेंडीसह पेनड्राईव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 12:26 AM2019-03-21T00:26:33+5:302019-03-21T00:27:53+5:30
लोकसभा निवडणुकीत अपक्षांसाठी टॉफी, भेंडी, लॅपटॉप, लुडो, शिटी, पेनड्राईव्ह, हेल्मेटसह आदी १९४ निवडणूक चिन्ह उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
नांदेड: लोकसभा निवडणुकीत अपक्षांसाठी टॉफी, भेंडी, लॅपटॉप, लुडो, शिटी, पेनड्राईव्ह, हेल्मेटसह आदी १९४ निवडणूक चिन्ह उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी १९ मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. २६ मार्चपर्यंत उमेदवारी दाखल करता येणार आहेत. या नामनिर्देशनपत्राची छाननी २७ मार्च रोजी होईल. २९ मार्चपर्यत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहेत. २९ रोजीच उमेदवारांना निवडणूक चिन्हही दिले जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांचे ७ चिन्हे राखीव आहेत. त्यामध्ये काँग्रेसचा हात, भाजपाचे कमळ, बसपचा हत्ती, कम्युनिष्ट पार्टीचा विळा आणि कणीस तसेच हातोडा, विळा, राष्टÑवादी काँग्रेसचे घड्याळ आणि तृणमल काँग्रेसचे फुले आणि गवत हे सात चिन्हे राष्टÑीय पक्षांचे आहेत. त्याचवेळी १३ राज्यांतील राज्यस्तरीय पक्षांचे चिन्हे त्या त्या पक्षांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
त्याचवेळी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारांसाठी निवडणूक आयोगाने तब्बल १९४ निवडणूक चिन्हे उपलब्ध करुन दिले आहेत. त्यात टॉॅफीसह तंबू, चिमटा, टूथब्रश, टूथपेस्ट, ट्रक, सिरींज, टीव्ही रिमोट, स्टॅप्लर, चहा गाळणी, सितार, कैची, स्पॅनर (पाना), पाटी, अंगठी, कुलर, रोलर, पेन्सील शॉपनर, उशी, मटर, भुईमूग, पेन स्टँड, भेंडी, पत्रपेटी, माईक, काडीपेटी, लंचबॉक्स, हेलिकॉप्टर, हेल्मेट, इस्त्री, चावी, किटली, फणस, हिरवी मिरची, हार्मोनियम, अंगुर, टोपी, फुटबॉल, नरसाळे, झगा, लिफाफा, डिशअँटींना, हिरा, डोली, बाज, आईस्क्रीम, हेडफोन, काचेचा ग्लास, हातगाडी, बासरी, डंबेल्स, कपबशी, साखळी, जातं, पोळपाट-लाटणे, संगणक, बादली, कॅमेरा, कॅलक्युलेटर, विटा, ब्रेड, बिस्कीट, बेल्ट, डिझेलपंप, ड्रिल मशीन, अद्रक, पँट, प्रेशर कुकर, पेट्रोलपंप, फ्रीज, रोडरोलर, दुर्बीण, सायकल पंप आदी १९४ निवडणूक चिन्ह उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख २९ मार्च आहे. २९ मार्च रोजी जे जे उमेदवार रिंगणात आहेत त्या अपक्ष उमेदवारांना उपरोक्त चिन्हांपैकी एक चिन्ह निवडावे लागणार आहे.
तिघांनी भरले उमेदवारी अर्ज
नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी १९ मार्चपासून नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येत आहेत. पहिल्या दिवशी काल एक अर्ज दाखल झाला होता, तर ५१ उमेदवारांनी ९३ अर्ज नेले होते. बुधवारी दुसऱ्या दिवशी आनंद पांडुरंग नवघड या अपक्ष उमेदवाराने तसेच अंकुश शिवाजीराव पाटील अपक्ष व राष्ट्रीय मराठा पार्टीच्या वतीने उमेदवारी दाखल केली. अल्ताफ अहेमद एकबाल अहेमद यांनी इंडियन युनियन मुस्लिम लीगच्या वतीने आपली उमेदवारी दाखल केली असून त्यांनी तीन अर्ज भरले आहेत. उद्या नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत.
कर्मचारी नियुक्त्यांचे काम अंतिम टप्प्यात
लोकसभा निवडणुकीत मुख्य उमेदवार हे २५ व २६ मार्च रोजीच उमेदवारी दाखल करण्याची शक्यता आहे. २१ मार्च धुलीवंदनाचा दिवस आहे. धुलीवंदनानंतर चौथा शनिवार व रविवार येत आहे. त्यामुळे मुख्य उमेदवारांचे अर्ज हे २५ व २६ मार्च रोजीच येतील, असेही स्पष्ट होत आहे. दरम्यान, प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीसाठी सज्ज होत आहे. विविध प्रशिक्षणे, आवश्यक साहित्यांची जुळवणी केली जात आहे. मतदान केंद्रावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांचे कामही अंतिम टप्प्यात आल्याचे निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांनी सांगितले.
चव्हाण दांपत्यांसाठी उमेदवारी अर्ज
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रमुख पक्षांकडून नेमके कोण रिंगणात उतरणार? याबाबत नांदेडकरांत मोठी उत्सुकता आहे. काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्यासह आ. अमिता चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. या अनुषंगाने २० मार्च रोजी नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर यांनी तर आ. अमिता चव्हाण यांच्यासाठी काँग्रेस शहर महानगराध्यक्ष आ. अमरनाथ राजूरकर यांनी अर्ज नेले आहेत. दरम्यान, बुधवारी नांदेड लोकसभेसाठी एकूण २८ उमेदवारांनी ५१ अर्ज घेतल्याचे सांगण्यात आले.