खत, बियाण्यांची आवक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:17 AM2021-05-14T04:17:43+5:302021-05-14T04:17:43+5:30
भाजीपाल्यांचे भाव गडगडले किनवट : संचारबंदीमुळे बाजारपेठा बंद असल्यामुळे भाजीपाल्यांचे भाव गडगडले आहेत. भाजीपाल्यांचे उत्पादन झाल्यानंतर लगेच विक्री करावी ...
भाजीपाल्यांचे भाव गडगडले
किनवट : संचारबंदीमुळे बाजारपेठा बंद असल्यामुळे भाजीपाल्यांचे भाव गडगडले आहेत. भाजीपाल्यांचे उत्पादन झाल्यानंतर लगेच विक्री करावी लागते. मात्र, बाजारपेठ बंद असल्याने भाज्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शहरातील वसाहतीमध्ये फिरून भाजीपाला विक्री केली जात आहे. मात्र, त्यातूनही फारसे उत्पन्न मिळत नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
भुईमुगाच्या शेंगा दाखल
बिलोली : शहरातील फळ, भाजीपाला मार्केटमध्ये भुईमुगाच्या शेंगा दाखल झाल्या आहेत. हातगाड्यांवर विविध व्यावसायिक विक्री करीत आहेत. सध्या शेंगांचे दर १०० ते १२० रुपये किलोने नागरिक खरेदी करत असल्याचे दिसत आहे.
माठ विक्रीला लॉकडाऊनचा फटका
मुखेड : कोरोना लॉकडाऊनमुळे माठ विक्रीला फटका बसला आहे. यातून मिळणारे उत्पन्न घटले. दरवर्षी उन्हाळ्यात गरिबांचा फ्रीज म्हणून ओळख असलेल्या माठास चांगली मागणी असते. मात्र, लॉकडाऊनमुळे आठवडी बाजार बंद असल्याने विक्रेत्यांना त्याचा फटका बसत आहे.
कॅशलेस व्यवहारात वाढ
नायगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पैसे हाताळण्यापेक्षा नागरिकांनी कॅशलेस व्यवहारावर भर दिला आहे. गेल्या काही दिवसांत अशा व्यवहारात वाढ झाली. दुसरीकडे सतत बँका बंद असल्यानेही हा व्यवहार वाढला. सध्या किराणासह मेडिकल आणि अन्य दुकानांत ऑनलाईन व्यवहाराचे पर्याय उपलब्ध असल्याने अनेकांना ते सोेपे जात आहे.
बोंढार शिवारात अपघात
नांदेड : वेगातील कारने दुचाकीला धडक दिल्यानंतर अर्ध्या किलोमीटर अंतरावर कार उलटल्याची घटना बोंढार बायपास मार्गावर १२ मे रेाजी घडली. या अपघातात दुचाकीवरील एक शिक्षक गंभीर जखमी झाला आहे. अर्जुन गुंडाळे असे शिक्षकाचे नाव आहे. एम.एच.४८-एफ.४७०६ या क्रमांकाच्या कारने प्रथम धडक दिली. नंतर अर्ध्या कि.मी. अंतरावर कार उलटली. पोलीस तपास करीत आहेत.
नारायण ओढणे सेवानिवृत्त
मालेगाव : महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील शिपाई नारायण ओढणे सेवानिवृत्त झाल्याने त्यांना एका कार्यक्रमात निरोप देण्यात आला. यावेळी एस. बी. घन, पी. डी. कळमकर, बारडचे व्ही. जे. पाटील उपस्थित होते. यावेळी मोनाली लोणकर यांचा एस. व्ही. आवरगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांच्या जागी रुजू झालेल्या जयश्री मुकुंद यांचे स्वागत करण्यात आले.
लांडगे यांची नियुक्ती
नांदेड : इंजिनिअरिंग कृती समितीच्या मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी सचिन लांडगे यांची नियुक्ती झाली. लांडगे यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविले होते. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन ही नियुक्ती झाली.
वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
माहूर : पडसा येथील विशाल उत्तम हिवाळे (वय २७) यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. १२ मे रोजी पहाटे दहिसावळी गावानजीक ही घटना घडली. हिवाळे हे पुसद येथील बँक कर्मचारी होते. १२ मे रोजी राळेगावकडे दुचाकीवर जात असताना हा अपघात घडला.
डोनगावमध्ये लसीकरण
बिलोली : तालुक्यातील डोनगाव (बु.) येथे लसीकरणाचे ५० टक्के काम झाले. गावातील घरोघरी जाऊन लसीकरणाचे महत्त्व सांगण्यात आले. याकामी पं. स. उपसभापती शंकर यंकम व आरोग्य कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. यावेळी वैद्यकीय अधिकारी सादक, आरोग्य सेविका, आशा वर्कर यांनीही सहकार्य केले.
परशुराम जयंती घरीच साजरी करा
नांदेड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ब्रह्मवृंदांनी यंदा परशुराम जन्मोत्सव घरीच साजरा करावा, असे आवाहन आर्य चाणक्य सेनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णा बेरळीकर यांनी केले. यावर्षी ऑनलाईन फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून वे. शा. स. भागवताचार्य नीलेश गुरुजी केदार यांच्या सुमधुर वाणीतून परशुराम चरित्र संध्याकाळी सहा वाजता होणार आहे. ब्रह्मवृंदांनी आपापल्या घरी परशुरामाच्या प्रतिमेचे पूजन व सायंकाळी आपल्या घरासमोर दीपप्रज्वलन करावे, असे आवाहन परशुराम जन्मोत्सवाचे अध्यक्ष अमित रेणापूरकर यांनी केले. दरवर्षी आर्य चाणक्य सेनेच्या वतीने अक्षय तृतीयानिमित्त परशुराम जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने शोभायात्राही काढण्यात येते. मात्र, कोरोनामुळे जन्मोत्सव, शोभायात्रा यावेळी रद्द करण्यात आली.