नांदेड लोकसभेसाठी दिग्गजांची फिल्डिंग; के. चंद्रशेखर, संभाजीराजेंना कार्यक्रत्यांचा आग्रह

By श्रीनिवास भोसले | Published: June 2, 2023 12:23 PM2023-06-02T12:23:53+5:302023-06-02T12:25:27+5:30

राजकीय पटलावर नांदेड कायमच चर्चेत; भाजपच्या एका सर्वेक्षणात खा. प्रताप पाटील चिखलीकर यांची नांदेडची जागा धोक्यात दाखविली आहे.

Fielding veterans for Nanded Lok Sabha; K. Chandrashekhar, Sambhaji Raje urged by activists | नांदेड लोकसभेसाठी दिग्गजांची फिल्डिंग; के. चंद्रशेखर, संभाजीराजेंना कार्यक्रत्यांचा आग्रह

नांदेड लोकसभेसाठी दिग्गजांची फिल्डिंग; के. चंद्रशेखर, संभाजीराजेंना कार्यक्रत्यांचा आग्रह

googlenewsNext

नांदेड : नांदेडलोकसभा मतदारसंघावर सध्या भाजपचे वर्चस्व आहे. परंतु, आगामी २०२४च्या लोकसभा निवडणुकीत नांदेडमधून लोकसभा लढविण्यासाठी अनेक दिग्गज नेत्यांना स्थानिक कार्यकर्त्यांकडून निमंत्रण दिले जात आहे. परंतु, हे निमंत्रण, आग्रह कार्यकर्त्यांचे आहे की त्यांच्या तोंडून नेत्यांचीच फिल्डिंग आहे. हा संशोधनाचाच विषय आहे. नांदेडमधून लोकसभा निवडणूक लढवावी, असा आग्रह स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांना कार्यकर्त्यांनी धरला आहे, तर दुसरीकडे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना बीआरएसचे नेते शंकरअण्णा धोंडगे यांनी निमंत्रण दिले आहे.

नांदेडला दोनवेळा शंकरराव चव्हाण आणि अशोकराव चव्हाण यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादीकडून नांदेडला केंद्रातील आणि राज्यातील मंत्रिपदेही मिळाली. परंतु, आज नांदेडकडे कोणतेच पद नाही. वर्षभरापूर्वी झालेल्या सत्तासंघर्षानंतर महाविकास आघाडीची वज्रमूठ घट्ट करण्याचा प्रयत्न घटक पक्षाकडून सुरू आहे. परंतु, कोण छोटा अन् कोण मोठा यावरून राज्य नेत्यांमधेच एकमत नसल्याने स्थानिकांची वज्रमूठ बांधणे कठीणच आहे. सर्वच पक्षांकडून जिल्हा परिषद, महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपेक्षा आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने संघटनात्मक बांधणी केली जात आहे.

आजघडीला नांदेड लोकसभा मतदारसंघावर भाजपची सत्ता असून, प्रतापराव चिखलीकर हे खासदार आहेत. परंतु, भाजपच्या एका सर्वेक्षणात नांदेडची जागा धोक्यात दाखविली आहे. त्यामुळे पक्षाकडून चेहरा बदलला जाणार की चिखलीकर यांच्याच पाठीमागे ताकद उभी केली जाणार हे येणारा काळच सांगेल. मात्र, नांदेडमध्ये भाजपविरुद्ध महाविकास आघाडी अथवा काँग्रेस असा सामना होईल, असे वाटत नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा.यशपाल भिंगे यांच्यामुळे सरळ होणारी लढत तिरंगी झाली होती. त्यांनी लाखाहून अधिक मतं घेतल्याने काँग्रेसचे उमेदवार अशोकराव चव्हाण यांचा ५० हजारांहून अधिक मतांनी पराभव झाला होता.

संभाजीराजेंना चार ठिकाणांहून आग्रह
स्वराज्य संघटनाप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी शिवशाहू रथयात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढला होता. त्यानंतर स्वराज्य संकल्प अभियानाच्या माध्यमातून ते महाराष्ट्रात फिरत आहेत. गावखेड्यामध्ये त्यांचे जोरदार स्वागत केले जात असून, चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, राजेंनी पुणे येथे स्वराज्यच्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी मला कार्यकर्त्यांचा चार ठिकाणांहून लोकसभा लढविण्यासाठी आग्रह असल्याचे सांगितले. यामध्ये नांदेड, नाशिक, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

मुख्यमंत्री केसीआर यांना नांदेडचे निमंत्रण
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या बीआरएस पक्षाचा देशभर विस्तार करण्यासाठी नांदेडातून सुरुवात केली आहे. पक्ष विस्तारासाठी ते तीनवेळा नांदेडात येऊन गेले. दरम्यान, केसीआर हे आगामी लोकसभा निवडणूक लढवतील, असे वक्तव्य बीआरएसचे स्थानिक नेते शंकरअण्णा धोंडगे यांनी एका वृत्तवाहिनीला बोलताना केले. तसेच केसीआर यांनी नांदेड अथवा छत्रपती संभाजीनगर येथून लोकसभा निवडणूक लढवावी, असा आग्रह त्यांनी धरला असून, तसे निमंत्रण देणार असल्याचे धोंडगे यांनी सांगितले.

वंचित बहुजन आघाडीचे काय?
वंचित बहुजन आघाडी गत २०१९च्या निवडणुकीमध्ये एमआयएमसोबत युती करून तिसऱ्या क्रमांकावर राहिली. त्यामुळे आगामी २०२४च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीसह एमआयएम काय भूमिका घेणार हेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.

या नेत्यांची वैचारिक बैठक अन् भविष्य...
शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी काम करण्याची भूमिका के. चंद्रशेखर राव यांनी घेतलेली आहे. तेलंगणातील विविध योजनांची भुरळ महाराष्ट्रातील मतदारांना पडत आहे. त्यात बीआरएसने संघटनात्मक बांधणीसाठी जोर लावला आहे. तसेच स्वराज्य प्रमुख संभाजीराजे हेदेखील महाराष्ट्र पिंजून काढत आहेत आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांनीदेखील पक्षाचे संघटन मजबूत केले आहे. या प्रमुख तीन नेत्यांची एकमेकांसोबत दोघा-दोघांमध्ये भेट झाली असून, त्यांची वैचारिक बैठक जुळल्यास भविष्यात महाराष्ट्रातील राजकारणाची दिशा बदलू शकते.

Web Title: Fielding veterans for Nanded Lok Sabha; K. Chandrashekhar, Sambhaji Raje urged by activists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.