नांदेडमध्ये फर्निचर दुकानाला भीषण आग; लाखोंचे साहित्य जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2021 09:34 AM2021-11-10T09:34:31+5:302021-11-10T09:40:21+5:30
या दुकानात पहाटे पाच वाजेपर्यंत काम सुरू होते. अचानक साडेसहाच्या सुमारास दुकानात आग लागली.
नांदेड- नवीन नांदेड आतील वसरणी भागात असलेल्या एका फर्निचरच्या दुकानाला भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही आग बुधवारी सकाळी सहा वाजता दरम्यान लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अग्निशमन दलाच्या दोन बंब आधारे ही आग विझवण्यात आली.
वसरणी येथे श्यामसिंह गोकुळसिंह चौधरी यांचे विनायक फर्निचर हे दुकान आहे. या दुकानात पहाटे पाच वाजेपर्यंत काम सुरू होते. त्यानंतर दुकान बंद करून दोघेजण बाहेर थांबले होते. अचानक साडेसहाच्या सुमारास दुकानात आग लागल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी याबाबत दुकान मालक तसेच इतरांना माहिती दिली. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले संपूर्ण दुकान आगीच्या लोळात बुडाले. नागरिकांनी या आगीबाबत अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाचे प्रमुख शेख पाशा यांच्यासह त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. एका बंबांनी आग आटोक्यात येणार नसल्याची बाब लक्षात येताच पाशा यांनी एमआयडीसी अग्निशमन दलालाही पाचारण केले.
एमआयडीसी अग्निशमन दलाचा बंबही घटनास्थळी पोहोचला. या दोन्ही बंबाद्वारे जवळपास अर्ध्या तासात संपूर्ण आग आटोक्यात आणली. या आगीत दुकानातील लाखो रुपयांचे फर्निचर भस्मसात झाले. घटनास्थळी घटनास्थळी नांदेड ग्रामीण पोलीसही दाखल झाले होते.. प्रत्यक्षदर्शींनी दुकानातील काही सामान बाहेर हे काढले परंतु काही वेळानंतर आग वाढतच गेली होती.