पाण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:10 AM2018-11-15T00:10:40+5:302018-11-15T00:12:24+5:30
नांदेड : पाणीप्रश्नाबाबत मराठवाड्यावर सातत्याने अन्याय होत आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास येणाºया काळात मराठवाड्याचे वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही. ...
नांदेड : पाणीप्रश्नाबाबत मराठवाड्यावर सातत्याने अन्याय होत आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास येणाºया काळात मराठवाड्याचे वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळेच पाणीप्रश्नाबाबत मराठवाडाभर जनजागरण करुन यासंबंधी रस्त्यावरची लढाई लढण्याची तयारी ठेवण्याचा निर्धार बुधवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत व्यक्त करण्यात आला.
‘मराठवाड्यातील सिंचन आणि पाणीप्रश्न’ या विषयावर माजी खा. डॉ. व्यंकटेश काब्दे यांच्या पुढाकाराने येथील पीपल्स महाविद्यालयात बैठक घेण्यात आली. बैठकीला जलतज्ज्ञ या. रा. जाधव यांच्यासह आ. डी.पी. सावंत, माजी आ. डी. आर. देशमुख, शंतनू डोईफोडे, राष्ट्रवादीचे सुनील कदम, इंजि. द. मा. रेड्डी, इंजि. व्यंकटराव आढाव, इंजि. बसवते, उत्तमराव सूर्यवंशी, भाऊराव मोरे, बाबूराव रोशनगावकर, डॉ. बालाजी कोंपलवार, प्रा. एस. एस. पाटील, कदम गुरुजी, इंजि. उन्हाळे, उमाकांत जोशी आदींसह विविध संस्था-संघटनांच्या पदाधिका-यांची उपस्थिती होती.
बैठकीच्या प्रारंभी जलतज्ज्ञ या. रा. जाधव यांनी मराठवाड्यातील पाणीप्रश्नाबाबत मुद्देसूद विवेचन केले. ज्या ठिकाणी पूर्वीपासून मोठ्या प्रमाणात सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे तिकडेच पाणी घेवून जाण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगत मराठवाडा जोपर्यंत पाणीप्रश्नाबाबत उठाव करणार नाही, तोपर्यंत काहीही होणार नसल्याचे सांगत जनतेच्या उदासीनतेमुळे पाणीप्रश्नाला सामोरे जावे लागत असल्याचे ते म्हणाले. जायकवाडीवर पैठण ते धर्माबाद दरम्यान बारा बंधारे आहेत. हे बंधारे भरुन मिळाले तर मराठवाड्याचा पाणीप्रश्न निकाली लागेल. मात्र तसे होताना दिसत नसल्यानेच आता आपल्याला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असे त्यांनी सांगितले.
आ. डी. पी. सावंत यांनी सध्या सुरू असलेल्या एकात्मिक जल आराखड्याकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. या आराखड्यात मराठवाड्यातील हक्काच्या पाण्याची नोंद झाली पाहिजे आणि त्यासाठी सर्वांनी आग्रही राहण्याची गरज व्यक्त केली. एकीकडे पायाभूत सुविधा तयार करायला सांगताना दुसरीकडे पाणी कपातीचे धोरण सरकार राबवित असल्याचे सांगत याप्रश्नी समितीकडून मराठवाडास्तरावर होणा-या लोकचळवळीत सक्रिय सहभाग घेण्याचा शब्द आ. सावंत यांनी दिला. जायकवाडी प्रकल्पावर कुठलीही परवानगी न घेता दहा धरणे बांधल्याचे सांगत याप्रकरणी समितीच्या वतीने न्यायालयात दाद मागू, असे माजी आ. डी. आर. देशमुख यांनी सांगितले. उमाकांत जोशी, डॉ. बालाजी कोंपलवार, डॉ. सुनील कदम, प्रा. एस.एस. पाटील यांच्यासह इतर पदाधिका-यांनी भूमिका मांडली. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत पाणीप्रश्नाबाबत जनजागरण करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
- मराठवाड्यातील पाणीप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी अराजकीय संघटन उभे करुन मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत लढा उभारण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला. ही समिती फक्त पाणीप्रश्नासाठी लढेल, असे स्पष्ट करतानाच मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतून प्रत्येकी दोन प्रतिनिधी या समितीत घेण्यात येतील. याबरोबरच जिल्ह्या-जिल्ह्यांतील पेन्शनर्स असोसिएशनला समितीसोबत जोडण्यात येईल. ३० जणांची संयोजन समिती नियुक्त करुन संघटन सशक्त तसेच व्यापक करण्यासाठी येत्या डिसेंबरमध्ये पुन्हा बैठक घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.