कंधार तालुक्यात २५ दिवस पुरेल एवढाच चारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:47 AM2019-05-23T00:47:56+5:302019-05-23T00:48:44+5:30
कंधार : तालुक्यात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. पशुधन मानार नदीकाठावर व जगतुंग समुद्रात पाण्यासाठी गर्दी करतानाचे चित्र ...
कंधार : तालुक्यात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. पशुधन मानार नदीकाठावर व जगतुंग समुद्रात पाण्यासाठी गर्दी करतानाचे चित्र आहे. त्यात आता केवळ २५ दिवसांचा चारा शिल्लक असून पावसाचे वेळेत आगमन झाले नाही तर ९१ हजार ७०८ पशुधनाला चाराटंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे पशुपालकांना पशुधनाचे संगोपन करण्याची चिंता सतावत असल्याचे चित्र आहे.
सलग काही वर्षे तालुका दुष्काळाचा सामना करत आहे. नागरिक व पशुधनाला पाणीटंचाईने बेजार केले आहे. शेतकऱ्यांना पिकाचा अपेक्षित उतारा मिळत नसल्याने आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. ऐन उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढते म्हणून नागरिक व पशुधनाला भटकंती करावी लागते. तालुक्यातील जलसाठे कोरडे पडले आहेत. पाणीपातळी खोल जात असल्याने विंधन विहिरी कोरड्या पडत आहेत. त्यामुळे पशुधनाला मानार नदीकाठावर व जगतुंग समुद्राचा मोठा आधार मिळत आहे. पशुपालक पशुधनाला पाणी देण्यासाठी कसरत करत आहेत.
एकोणिसाव्या पशुगणनेनुसार तालुक्यातील पशुधनसंख्या लहान व मोठे मिळून ९१ हजार ७०८ आहे. लहान पशुधन २२ हजार ७५४ आहे. त्यांना प्रतिदिन चारा ३ किलो व पाणी २० लिटर लागते. मोठ्या पशुधनाची संख्या ६८ हजार ९५४ असून प्रतिदिन चारा ६ किलो व पाणी ४० लिटर लागते. पशुसंवर्धन विभागाने न्युट्रीफीड व ठोंबे पुरवठा केला. मका ४०० किलो, ज्वारी ३२० किलो, न्युट्रीफीड २१० किलो व ठोंबे ३ लाख १२ हजार पुरवठा केल्याने हिरवा चारा पशुपालकांना उपलब्ध झाला. हा चारा १ हजार ३५६ मे. टन उपलब्ध झाला व खरीप-रबीपासून ११ लाख ६ हजार १५९ मे. टन उपलब्ध झाला. आॅक्टोबर २०१८ पासून १५ जून २०१९ पर्यंत पुरेल असे पशुसंवर्धन विभागाच्या अहवालातून समोर आले आहे.
१५ जूनपूर्वी पावसाचे आगमन झाले तर नवीन चारा निर्माण होईल व पशुधनाला आधार मिळेल. अन्यथा चाºयाविना पशुधनाची परवड अटळ आहे. पशुधनाला जगविण्यासाठी ऐन दुष्काळात पशुपालकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागणार आहे. अन्यथा बेभावात पशुधन विक्री करून चाराटंचाईतून सुटका करवून घ्यावी लागणार आहे.
सलग निसर्गचक्राचा फटका सहन करून शेतकरी व पशुपालक मेटाकुटीला आला आहे. चारा उपलब्ध असल्याचे कळविण्यात आल्याने आजतरी चारा छावणीचा विषय नाही. मात्र जून महिन्यात चारा टंचाईचे चटके पशुधनाला झेलावे लागणार असल्याचे चित्र आहे.