अखेर तमलूर वाळू घाटावरील उपसा केला बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 12:18 AM2019-06-02T00:18:31+5:302019-06-02T00:19:43+5:30
देगलूर तालुक्यातील तमलूर वाळू घाटावर क्षमतेपेक्षा जास्त वाळू उपसा झाल्यामुळे येथील वाळू उपसा बंद करण्याचे आदेश देगलूर तहसीलदारांनी दिले आहे.
अनुराग पोवळे ।
नांदेड : देगलूर तालुक्यातील तमलूर वाळू घाटावर क्षमतेपेक्षा जास्त वाळू उपसा झाल्यामुळे येथील वाळू उपसा बंद करण्याचे आदेश देगलूर तहसीलदारांनी दिले आहे. गेल्या चार दिवसांपासून हा वाळू घाट बंद असून ३ जून रोजी येथे झालेल्या वाळू उपशाची मोजणी केली जाणार आहे.
देगलूर तालुक्यातील तमलूर येथे लेंडी नदीतील वाळू घाटाचा लिलाव करण्यात आला होता. या ठिकाणी २ हजार ६५० ब्रास वाळू उपसा करण्यास परवानगी देण्यात आली होती. या वाळू घाटासाठी ९४ लाख १ हजार ५०० रुपये सर्वोच्च बोली लागली होती. वाळूघाट ताब्यात दिल्यानंतर येथे नियमानुसार वाळू उपसा होणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात या ठिकाणी रात्रं-दिवस जेसीबी मशिनने वाळू उपसा करीत हजारो ब्रास वाळू नेण्यात आली. येथील लाल वाळूला आंध्र, कर्नाटक या राज्यांत मोठी मागणी आहे. दररोज लाखों रुपयांचा वाळू उपसा केला जात होता.
त्यासह संपूर्ण राज्यात नांदेड जिल्ह्यातील वाळूला मोठी मागणी आहे. पुणे, मुंबई, नाशिक आदी मोठ्या शहरांत वाळू नेली जात आहे. परिणामी वाळूचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
तमलूर वाळू घाटावर नियमांचे उल्लंघन करुन सुरू असलेल्या उपशाबाबत तमलूरच्या सरपंचासह अनेकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. ताब्यात दिलेल्या गटामधून उत्खनन करता दुसऱ्या गटातून उत्खनन केले जात होते. या ठिकाणी बोगस पावत्यांचाही वापर केला जात होता. परवानगीपेक्षा अधिक क्षमतेच्या वाहनांद्वारे रात्रं-दिवस वाहतूक करणे आदी तक्रारी करण्यात आल्या होत्या. अखेर या तक्रारीची दखल घेत देगलूरचे तहसीलदार अरविंद बोलगणे यांनी तमलूर वाळूघाट बंद करण्याचे आदेश दिले आहेत. चार दिवसांपासून हा वाळू घाट बंद असल्याची माहिती तहसीलदार बोलगणे यांनी दिली. या वाळूघाटावर परवानगीपेक्षा जादा वाळू उपसा झाल्याचेही ते म्हणाले. प्रत्यक्षात येथे किती वाळू उपसा झाला, याची मोजणी केली जाणार असून ३ जून रोजी ही मोजणी होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, जिल्ह्यात परवानगी दिलेल्या बहुतांश वाळू घाटांवर परवानगीपेक्षा जास्त उत्खनन झाल्याची परिस्थिती आहे. उमरी तालुक्यातील कौडगाव आणि महाटी येथील वाळू घाटही प्रशासनाने क्षमतेपेक्षा अधिक उपसा झाल्यामुळे बंद करण्याची कारवाई केली आहे.
बोगस पावत्यांचा वापर
गौण खनिजाच्या वाहतुकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून गौण खनिज वाहतूक परवाना दिला जातो. या परवान्याशिवाय गौण खनिजाची वाहतूक शक्य नाही. मात्र आजघडीला विनापावत्याच गौण खनिजाची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्याचवेळी ज्या पावत्या वापरात आहेत त्यातही बोगस पावत्यांचेच प्रमाण मोठे आहे. खुद्द जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी मरखेल येथे सगरोळी घाटावरुन वाळू भरुन जात असलेल्या वाहनांची तपासणी केली. एक नव्हे, दोन नव्हे तब्बल २७ वाहने त्यांनी तपासली. यातील सर्व पावत्या बोगस असल्याचे उघड झाले. मात्र खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करुनही या बोगस पावत्यांच्या प्रकरणातील पुढील कारवाई मात्र गुलदस्त्यात आहे. त्यामुळे चौकशी होणार तरी कुठली, हा प्रश्न आहे.
जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी परवानगीपेक्षा जादा वाळू उपसा
जिल्ह्यात देगलूर तालुक्यातील मेदनकल्लूर घाटावर १ हजार ३२५ ब्रास उपसा करण्याची परवानगी दिली आहे. सांगवी उमर येथे १ हजार ५११, शेळगाव-२ येथे ३ हजार ७८४, बिलोली तालुक्यातील गंजगाव-२ येथे ६ हजार ५१९, कार्ला बु. येथे २ हजार १४, माचनूर येथे ६ हजार ९२६, सगरोळी येथे ३ हजार ११०, गोळेगाव येथे ३ हजार ८१६, उमरी तालुक्यातील कौडगाव येथे ३ हजार ९२, एरंडल येथे २ हजार ८६२, महाटी येथे २ हजार ८७१, नायगाव तालुक्यातील मेळगाव येथे ८ हजार ४८१, धनज येथे ६ हजार ७८४ ब्रास वाळू उपसा करण्याची परवानगी दिली होती. यातील धनजसह अन्य २ वाळू घाट लिलावातील बोलीनंतरही ठेकेदारांनी पूर्ण रक्कम न भरल्याने सुरू झाले नाहीत. अधिकृतरीत्या येथे वाळू उपसा झाला नसला तरीही प्रत्यक्षात अवैध मार्गाने मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केला जात आहे.