विद्यापीठातील सफाई कामगारांची आर्थिक लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:20 AM2021-02-09T04:20:19+5:302021-02-09T04:20:19+5:30
कॉ. गंगाधर गायकवाड यांनी सतत पाठपुरावा करून विद्यापीठ, जिल्हाधिकारी कार्यालय व सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर उपोषण, धरणे, निदर्शने केली ...
कॉ. गंगाधर गायकवाड यांनी सतत पाठपुरावा करून विद्यापीठ, जिल्हाधिकारी कार्यालय व सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर उपोषण, धरणे, निदर्शने केली होती. आ. मोहन हंबर्डे यांनी संबंधितांना सूचना दिल्या आणि युनियनने दिलेली सफाईदार कामगारांची यादी पाठविली व कामगारांना रुजू करून घेण्यास सांगितले. तत्कालीन ठेकेदाराचे टेंडर संपल्यामुळे विद्यापीठाकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्या ठेकेदारास टेंडर मिळू नये म्हणून युनियनपुढे आव्हान होते. त्या ठेकेदाराच्या विरोधात सीटूने अनेक आंदोलने केली होती. त्याच्या कंपनीस काळ्या यादीत टाकण्याची मागणी कामगारांनी केली होती. टेंडर मिळविण्यासाठी त्या ठेकेदाराने प्रयत्न केले आणि काही कामगार अधिकाऱ्यांना हाताशी धरून टेंडर मिळण्यास पात्र यादीत त्या एजन्सीचे नावदेखील आले होते. मात्र, या कंत्राटदारास टेंडर मिळाले नाही. त्यामुळे कामगारांचा विजय झाला होता. परंतु, आता नवीन कंत्राटदार कामगारांच्या दरमहा पगारातून प्रत्येक कामगारांकडून दोन हजार रुपये सर्रासपणे लूट करत आहे. कामगारांना तत्काळ गॅप देण्याच्या नावाखाली कामावरून कमी केले जाते. महिला कामगार असेल तर वरील टोळीतील गुंड त्या कामगारांची बदनामी करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. मूळ मालक विद्यापीठ असल्याने कुलगुरू यांनी तक्रारीप्रमाणे कारवाई करावी. या मागणीची विद्यापीठ व राज्य प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अन्यथा पुढील आठवड्यात सीटूच्या झेंड्याखाली विद्यापीठ, कामगार आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे कॉ. गायकवाड यांनी सांगितले.