लॉकडाऊनमुळे आर्थिक होरपळलेल्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती 'अनलॉक' कधी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 05:34 PM2020-08-08T17:34:21+5:302020-08-08T17:39:26+5:30
नांदेड जिल्ह्यात २ हजार ९८१ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा छदामही नाही
- अनुराग पोवळे
नांदेड : जिल्ह्यात २ हजार ९८१ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा एक छदामही मिळाला नाही़ त्यामुळे लॉकडाऊन काळात या विद्यार्थ्यांची आर्थिक होरपळ होत आहे़ त्याचवेळी जिल्ह्यात मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील रक्कम देण्यासाठी तब्बल १८ कोटी ८१ लाख १६ हजार ६०० रुपयांची आवश्यकता असल्याचे राज्याच्या समाजकल्याण आयुक्तांना कळविण्यात आले आहे़
जिल्ह्यात शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील डॉ़बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत नवीन (फ्रेश) व नूतनीकरण असे एकूण ६ हजार ८४४ विद्यार्थ्यांचे अर्ज समाजकल्याण विभागाकडे प्राप्त झाले होते़ त्यापैकी छाननीअंती ४ हजार ४४८ विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र ठरले आहेत़ पात्र झालेल्या अर्जांपैकी ९६९ विद्यार्थ्यांना पहिल्या हप्त्याची रक्कम १ कोटी ५५ लाख १० हजार ९०० रुपये विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे़ आजघडीला नवीन (फ्रेश) २ हजार ९८१ विद्यार्थ्यांचा पहिला व दुसरा हप्ता मिळून १४ कोटी २ लाख ९३ हजार १०० रुपये, नूतनीकरणाच्या ५०८ विद्यार्थ्यांच्या पहिल्या हप्त्यासाठी १ कोटी १ लाख ६० हजार रुपये आणि नूतनीकरणाच्या १ हजार ४७७ विद्यार्थ्यांना दुसरा हप्ता देण्यासाठी ३ कोटी ७६ लाख ६३ हजार ५०० रुपये आवश्यक आहेत़
शिष्यवृत्तीची एकूण रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी नांदेड समाजकल्याण विभागाला १८ कोटी ८१ लाख १६ हजार ६०० रुपये आवश्यक आहेत़ याबाबत समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी राज्याच्या समाजकल्याण आयुक्त, पुणे आणि इतर मागास कल्याण बहुजन विभागाच्या संचालकांना ही बाब एका पत्रान्वये कळविली आहे़
जिल्ह्यात शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील अनुसूचित जाती, विजाभ, इमाव व विमाप्र प्रवर्गातील ३५ हजार ५७३ विद्यार्थ्यांचे अर्ज जिल्हास्तरावरुन मंजूर करण्यात आले आहेत़ त्यापैकी २३ हजार ९०८ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा पहिला हप्ता मिळाला आहे़ तर १५ हजार ३४८ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा दुसरा हप्ता देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़
टिष्ट्वटरवर ‘स्वाधार अवर राईट’ ट्रेन्ड
जिल्ह्यात २०१९-२० मधील विद्यार्थ्यांना डॉ़ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना व भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना लाभाची रक्कम मिळाली नसल्याने २ आॅगस्ट रोजी शुद्धोधन कापसीकर यांनी टिष्ट्वटर व फेसबुक या माध्यमाद्वारे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले़ तब्बल ११ हजार विद्यार्थ्यांनी टिष्ट्वटरवर ‘स्वाधार अवर राईट’ हा ट्रेन्ड चालविला़ या आंदोलनास युवा पँन्थरचे राहुल प्रधान, अभिमान राऊत यांनीही पाठिंबा दिला़ या शिष्यवृत्तीच्या प्रश्नावर युवा पॅन्थरने १० आॅगस्ट रोजी समाजकल्याण कार्यालयापुढे आंदोलनाचा इशाराही दिला आहे़