२१ पैसे जादा आकारल्याने ४० हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:17 AM2021-02-14T04:17:03+5:302021-02-14T04:17:03+5:30
नांदेड - येथील श्री राज फार्मा अपेक्स हॉस्पिटल या औषध विक्रेत्याला आणि भागीदाराला एका इंजेक्शनमागे २१ पैसे जादा आकारल्याने ...
नांदेड - येथील श्री राज फार्मा अपेक्स हॉस्पिटल या औषध विक्रेत्याला आणि भागीदाराला एका इंजेक्शनमागे २१ पैसे जादा आकारल्याने न्यायमूर्ती सतीश हिवाळे यांनी औषध नियंत्रण आदेश कायद्यांतर्गत ४० हजार रुपयांचा दंड आणि कोर्ट उठेपर्यंतची शिक्षा ठोठावली. श्रीराज फार्मा येथून शिवाजीनगर भागातील रहिवासी मुन्ना अब्बास यांनी डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनद्वारे फोर्टविन इंजेक्शन खरेदी केले होते. या इंजेक्शनचा दर जादा आकारण्यात आल्याने अन्न व औषध प्रशासनाकडे बिलाच्या पुराव्यासह १० मे २००७ रोजी तक्रार देण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेऊन औषध निरीक्षक राजगोपाल बजाज यांनी तपास केला. त्यात इंजेक्शनमागे २१ पैसे जादा आकारण्यात आल्याचे पुढे आले. त्यामुळे औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा व जीवनाश्यक वस्तू अधिनियमांतर्गत न्यायालयात श्रीराज फार्मा आणि त्यांचे भागीदार सदानंद मेडेवार, मोहम्मद जियाउद्दीन अहम, श्रीकांत पतंगे, अनुसयाबाई सूर्यवंशी, प्रकाश कदम, प्रदीप अग्रवाल, राहुल मेडेवार यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात ११ फेब्रुवारी २०२१ रोजी न्यायमूर्ती सतीश हिवाळे यांनी सर्वांना ४० हजार रुपयांचा दंड आणि कोर्ट उठेपर्यंतची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षाच्यावतीने ॲड. एस. बी. चावरे यांनी बाजू मांडली.