डीजे वाजवल्याप्रकरणी बिलोलीत १२ जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 04:51 PM2018-03-30T16:51:13+5:302018-03-30T16:51:13+5:30
पोलिसांनी लिखित पूर्व सूचना देऊनही रामनवमीच्या शोभायात्रेत डीजे वाजवल्या प्रकरणी १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिलोली (नांदेड ) : पोलिसांनी लिखित पूर्व सूचना देऊनही रामनवमीच्या शोभायात्रेत डीजे वाजवल्या प्रकरणी १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी वापरण्यात आलेले डीजेचे वाहन जप्त करण्यात आले असून याच्या तेलंगणातील मालकाचा शोध सुरु आहे.
शहरात तीन दिवसांपूर्वी शांतता सभेत बिलोली पोलिसांनी शोभायात्रेत डीजे वर बंदी असल्याची सूचना दिली होती. गुरुवारी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी शहरातून राम नवमीची शोभायात्रा काढली. शोभायात्रा सुरु होण्याआधी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे व पोलीस निरीक्षक भगवान घबडगे यांनी शोभायात्रेत डीजे न वाजवण्याची विनंती केली. मात्र याला न जुमानता कार्यकर्त्यांनी शोभायात्रेत डीजे वाजवलाच. यावेळी पोलिसांनी शांत राहत मिरवणूक संपताच रात्री १०.३० च्या दरम्यान डीजेचे वाहन जप्त केले. यासोबतच शोभा यात्रेचे आयोजक विश्व हिंदू परिषद, बजरंग दलचे कार्यकर्ते व डीजे सिस्टीमचे चालक - मालक अशा १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.