पेट्रोलमध्ये बिडीची ठिणगी पडल्याने आगीचा भडका; पती-पत्नीसह मुलाचा होरळून मृत्यू, देगलूरमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 08:53 PM2022-08-11T20:53:35+5:302022-08-11T20:56:52+5:30
देगलूर तालुक्यातील बल्लूर येथील शेतमजूर सुरेश बिरादार फवारणी पंपामध्ये पेट्रोल भरत होते, यावेळी बिडीची ठिणगी पेट्रोलवर उडाल्याने आगीचा भडका उडाला.
देगलूर (जि. नांदेड) : देगलूर तालुक्यातील बल्लूर येथे नागपंचमीच्या दिवशी एक मोठी दुर्घटना घडली होती. घरात असलेल्या पेट्रोलचा भडका उडाल्याने कुटुंबातील तिघे गंभीर जखमी झाले होते. काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, पण आज त्यांची प्राणज्योत मालवली. या दुर्दैवी घटनेत पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू झाला.
बल्लूर येथील शेतमजूर सुरेश बिरादार (वय ५२) हे दोन ऑगस्टला नागपंचमीच्या दिवशी घरात असलेल्या फवारणी पंपामध्ये पेट्रोल भरत होते, यावेळी बिडीची ठिणगी पेट्रोलवर उडाल्याने आगीचा भडका उडाला. यावेळी सुरेश बिरादार व त्यांची पत्नी गंगूबाई बिरादार (४६) हे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. त्यांना वाचविण्यासाठी मुलगा कपिल बिरादार (२१) आणि मुलगी स्वाती (१९) हे धावले. मात्र, यामध्ये हे दोघेही होरपळले गेले.
ही घटना समजताच गावातील नागरिकांनी या चौघांनाही देगलूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यामध्ये मुलगी स्वाती हिच्यावर देगलूरमध्येच प्राथमिक उपचार करण्यात आले. पती-पत्नी व मुलगा गंभीररीत्या भाजले असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात पाठवून उपचार केले जात होते. परंतु शुक्रवारी ५ रोजी सकाळी सहा वाजेदरम्यान वडील सुरेश बिरादार व मुलगा कपिल बिरादार यांचा मृत्यू झाला. दुपारी त्यांच्यावर गावात अंत्यसंस्कार करण्यात येऊन काही तास उलटले असताना याच दिवशी रात्री आठ वाजेदरम्यान गंगूबाई बिरादार याही मरण पावल्याची खबर गावात धडकली.