माहुरात फर्निचर गोदामास आग, लाखोंचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 06:59 PM2018-11-16T18:59:59+5:302018-11-16T19:01:12+5:30
शहरातील आबासाहेब पारवेकर नगर स्थित फायबर फर्निचर साहित्य असलेल्या गोदामास आज सकाळी ७ वाजेच्या दरम्यान भीषण आग लागली.
श्री क्षेत्र माहूर (नांदेड ) : शहरातील आबासाहेब पारवेकर नगर स्थित फायबर फर्निचर साहित्य असलेल्या गोदामास आज सकाळी ७ वाजेच्या दरम्यान भीषण आग लागली. यात फायबर फर्निचरचे साहित्य व गोदामाचे शेड जळाल्याने सुमारे ६० लाख रुपयांचे नुकसान झाले.
माहूर शहरात आज सकाळी ७ वाजेच्या दरम्यान आबासाहेब पारवेकर नगरात मोठे धुराचे लोळ आकाशात दिसत असल्याने नागरिकांनी धुराच्या दिशेने धाव घेतली. नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांचे बंधू जुनेद कादर दोसानी यांच्या फायबर फर्निचरचे गोदामाला आग लागल्याचे दिसून आले. याची माहिती मिळताच माहूर नगरपंचायतच्या मुख्याधिकारी विद्या कदम, कार्यालय अधीक्षक तथा लेखापाल वैजनाथ स्वामी यांनी घटनास्थळी धाव घेतली.
आग आटोक्यात आणण्यासाठी माहूर न.प.च्या अग्निशमन वाहनाने तीन फेऱ्या करत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले़ नगरसेवक इलियास बावाणी, न.प. चे स्वच्छतादूत गणेश जाधव व न.प.चे सर्व कर्मचारी व उपस्थित नागरिकांनी बचाव कार्यात झोकून देत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले़ दरम्यान नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांना आग विझवितांना आगीच्या दाहकतेचे चटके लागल्याने किरकोळ दुखापत झाली. किनवट, पुसद, उमरखेड येथील अग्निशमन दलाच्या वाहनास पाचारण करण्यात आले.
आगीचा फटका शेजारील काही घरांनाही बसला. दरम्यान, गोदामात असलेले एकूण ५० लाख रुपये किंमतीचे फायबर खुर्च्या, फोमच्या गाद्या, व फायबर फर्निचर, फ्रीज, कुलर, कपाट, व विक्रीसाठी असलेले गृहउपयोगी साहित्य जळून खाक झाले असल्याचा अंदाज आहे. तब्बल अडीच तास चाललेले आगीचे तांडव अडीच तासाच्या अथक प्रयत्नाने आटोक्यात आले. धुराचे लोळ आर्णी, सारखणी, महागाव फुलसावंगी इथपर्यंत दिसल्याने येथील नागरीकांनी माहूर शहरातील आपल्या नातेवाईकांना दूरध्वनी वरून घटनेबाबत विचारणा केली़