महाराष्ट्रात गर्दभांचे पहिले चिकित्सालय नांदेड जिल्ह्यात; पहिल्याच दिवशी २२० गर्दभांची तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 07:22 PM2020-12-24T19:22:44+5:302020-12-24T19:28:47+5:30

बिलोली तालुक्यातील सगरोळी येथे धर्मा डाँकी सँच्युरी या संस्थेच्या वतीने केवळ गाढवांसाठी पूर्णवेळ चिकित्सालय सुरू करण्यात आले आहे. 

The first donkey clinic in Maharashtra is in Nanded district; Examination of 220 donkeys on the first day itself | महाराष्ट्रात गर्दभांचे पहिले चिकित्सालय नांदेड जिल्ह्यात; पहिल्याच दिवशी २२० गर्दभांची तपासणी

महाराष्ट्रात गर्दभांचे पहिले चिकित्सालय नांदेड जिल्ह्यात; पहिल्याच दिवशी २२० गर्दभांची तपासणी

Next
ठळक मुद्देगाढवास एखादा आजार जडला तर त्यांच्यात मृत्यूचे प्रमाण अधिक असते.तज्ज्ञ डाॅक्टरांनी २२० गाढवांची तपासणी, लसीकरण व निर्जंतुकीकरण करत विविध आजारावर उपचार केले

सगरोळी (जि.नांदेड) :  बिलोली तालुक्यातील सगरोळी येथे धर्मा डॉंकी सँचुरी संस्थेच्यावतीने केवळ गाढवांसाठीच पूर्णवेळ दवाखाना सुरु करण्यात आला आहे. या चिकित्सलयाच्या उद्घाटना दिवशीच आयोजित शिबीरामध्ये २२० गाढवांचे लसीकरण व निजंर्तुकीकरण करण्यात आले. गाढवास एखादा आजार जडला तर त्यांच्यात मृत्यूचे प्रमाण अधिक असते. उपचाराअभावी पशू पालकांचेही मोठे आर्थिक नुकसान होत असल्याने हा दवाखाना सुरु करण्यात आला असून महाराष्ट्रातील हा एकमेव दवाखाना असल्याचे संस्थेचे विश्वस्त अभिजीत महाजन यांनी सांगितले.

अमेरिकास्थीत असलेले रतीलाल आणि बोनी शहा हे दाम्पत्य कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांनी सगरोळी येथे उभारलेल्या संस्थेमध्ये येत असत. शहा दाम्पत्य अमेरिकेत प्राण्यांसाठी काम करतात. सगरोळी येथे आल्यानंतर त्यांनी परिसरात गाढवांना मोठ्या प्रमाणात ओझे वाहून नेताना पाहिले. या गाढवांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. त्यातूनच धर्मा डाँकी सँचुरी या संस्थेची सन २००० मध्ये माजी केंद्रीयमंत्री मनेका गांधी यांच्या हस्ते स्थापना करण्यात आली. या माध्यमातून गाढवांचे पालन करणाऱ्यांचा संपर्क वाढत गेला. गाढवांच्या आरोग्यासंदर्भातील अनेक बाबी पुढे आल्यानंतर केवळ गाढवांसाठीच हा पूर्णवेळ दवाखाना सुरू केल्याचे महाजन यांनी सांगितले. बुधवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या उपस्थितीत या चिकित्सालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संस्थेचे विश्वस्त रोहीत देशमुख यांच्यासह डाॅ.शंकर उदगीरे, डाॅ.अरविंद गायकवाड, डाॅ.एस.बी.रामोड, कृषी विज्ञान केंद्राचे पशूवैद्यक डाॅ.निहाल अहमद मुल्ला, भास्कर बुच्छलवार, राजू गिरगावकर यांची उपस्थिती होती.

सहा ठिकाणी विशेष कॅम्पचे आयोजन
सगरोळी येथे हा पूर्णवेळ दवाखाना चालविण्यात येत असून येथील संस्कृती संवर्धन मंडळाच्या कृषी विज्ञान केंद्रातील डाॅक्टर तपासणी आणि उपचाराची जबाबदारी सांभाळत आहेत. मात्र इतर भागातील गाढवांना उपचार मिळण्याची गरज आहे. सगरोळी येथे उपचारासाठी आणताना त्यांची पायपीट होऊ नये यासाठी संस्थेने पुढील आठवड्यात सगरोळीसह मुगाव, बरबडा, तमलूर, एकलारा, आरोळी आदी सहा ठिकाणी विशेष कॅम्पचे आयोजनही केले आहे.

चिकित्सालयात लसीकरणाबरोबरच उपचारही
गाढव हा अश्व गटातील प्राणी आहे. गाढवाच्या शरीराची रचना वेगळी असल्याने त्याच्यावर त्या क्षेत्रातील तज्ज्ञ डाॅक्टरांकडूनच उपचार करावे लागतात. सध्या सगरोळी येथील या चिकित्सालयात गाढवांचे लसीकरण, निर्जंतुकीकरण याबरोबरच विविध आजारावर उपचारही केले जात आहेत. या दवाखान्यासाठी कुठलाही शासकीय निधी उपलब्ध नसला तरी हैदराबाद येथील ब्ल्यू क्राॅस आणि दिल्ली येथील प्राण्यांसाठी काम करणाऱ्या ब्रुक हाॅस्पीटलची मदत मिळत असल्याचे अभिजित महाजन यांनी सांगितले.

मृत्यूचे प्रमाण होईल कमी

गाढवांना सर्रास चर्रा नावाचा आजार होतो. यामध्ये गाढव चक्कर येऊन गोल फिरून खाली पडले आणि त्यातच त्याचा मृत्यू होतो. गाढवाच्या मृत्यूमुळे पशूपालकांचेही मोठे नुकसान होते. उपचारांची सोय नसल्याने गाढवांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. या रुग्णालयामुळे हे प्रमाण कमी होईल असेही त्यांनी सांगितले.

Web Title: The first donkey clinic in Maharashtra is in Nanded district; Examination of 220 donkeys on the first day itself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.