आधी धुक्यामुळे, आता ब्लॉकमुळे नांदेडहून धावणाऱ्या सहा रेल्वे रद्द
By प्रसाद आर्वीकर | Published: January 18, 2024 04:00 PM2024-01-18T16:00:19+5:302024-01-18T16:00:53+5:30
मागील वर्षभरात या न त्या कारणांमुळे रेल्वे रद्द किंवा अंशत: रद्द केल्या जात आहेत.
नांदेड : मागील महिनाभरापासून रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. उत्तर भारतामध्ये पडणाऱ्या धुक्यामुळे नांदेडहून धावणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द कराव्या लागल्या होत्या. आता मथुरा रेल्वे स्थानकावर घेतलेल्या ब्लॉकमुळे पुन्हा एकदा सहा रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत.
नांदेड विभागातून रेल्वे वाहतुकीला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळतो. नांदेड विभागात सध्या रेल्वेची विविध कामे सुरू आहेत. मागील वर्षभरात या न त्या कारणांमुळे रेल्वे रद्द किंवा अंशत: रद्द केल्या जात आहेत. त्यातच मागील आठवड्यात उत्तर भारतातील धुक्यामुळे सचखंड रेल्वे रद्द केली होती. आता मथुरा रेल्वे स्थानकावर वाॅर्ड रिमॉडेलिंगचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे मेगा लाइन ब्लॉक घेतला असून, त्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला आहे.
नांदेड येथून धावणारी नांदेड- अमृतसर (१२७१५) ही रेल्वे २१ जानेवारी ते ४ फेब्रुवारीपर्यंत रद्द केली आहे. तसेच परतीच्या प्रवासातील अमृतसर- नांदेड (१२७१६) ही रेल्वे ६ फेब्रुवारीपर्यंत रद्द आहे, तसेच नांदेड- जम्मूतावी (१२७५१) हमसफर साप्ताहिक एक्सप्रेस २६ जानेवारी आणि २ फेब्रुवारी रोजी रद्द केली आहे. जम्मूतावी-नांदेड (१२७५२) २८ जानेवारी आणि ४ फेब्रुवारी रोजी रद्द, नांदेड- हजरत निजामुद्दीन (१२७५४) साप्ताहिक एक्सप्रेस ही रेल्वे २३ आणि ३० जानेवारी रोजी तर हजरत निजामुद्दीन- नांदेड (१२७५४) साप्ताहिक एक्सप्रेस २४ आणि ३१ जानेवारी रोजी रद्द करण्यात आली आहे.