‘वंचित’ची पहिली यादी जुलै अखेरपर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 03:08 PM2019-07-25T15:08:42+5:302019-07-25T15:10:04+5:30
आगामी निवडणुकीत एमआयएमसोबतच राहणार आहे.
नांदेड : वंचित बहुजन आघाडीने बुधवारी जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघाच्या उमेवारीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. उमेदवारांची पहिली यादी जुलै अखेरपर्यंत घोषित केली जाऊ शकते असे पार्लमेंट्री बोर्डाचे सदस्य अण्णाराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आगामी निवडणुकीत एमआयएमसोबतच राहणार आहे. लक्ष्मण माने यांच्याशी मतभेद झाले असले तरी ते अद्याप पक्षातच असल्याचे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
येथील शासकीय विश्रामगृहावर इच्छुकांच्या मुलाखतीला सकाळी साडेअकरापासून प्रारंभ झाला. मोठ्या संख्येने इच्छुक या मुलाखतीसाठी उपस्थित होते. दरम्यान, काँग्रेसकडून आघाडीसंदर्भात एक पत्र आल्याचे अण्णाराव पाटील यांनी सांगितले.
यांनी घेतली मुलाखत
वंचित आघाडीतर्फे भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष तथा पार्लमेंट्री बोर्डाचे सदस्य अशोक सोनवणे, वंचित बहुजन आघाडीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, अण्णाराव पाटील यांनी मुलाखती घेतल्या. कार्यकर्त्यांमध्ये जिल्हाध्यक्ष मोहन राठोड, डॉ. संघरत्न कुऱ्हे , श्याम कांबळे, के.एच. वन्ने, देवानंद सरोदे, श्याम निलंगेकर आदी उपस्थित होते.