गुरुद्वारा बोर्डाची पहिली बैठक रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 12:42 AM2019-04-01T00:42:17+5:302019-04-01T00:44:34+5:30
सचखंड गुरुद्वारा बोर्डावर शासनाकडून अध्यक्षांची नियुक्ती केल्याच्या निर्णयाचा शीख समाजाकडून विरोध होत असताना बोर्डाची पहिली बैठक १ एप्रिल रोजी ठेवण्यात आली होती़
नांदेड : सचखंड गुरुद्वारा बोर्डावर शासनाकडून अध्यक्षांची नियुक्ती केल्याच्या निर्णयाचा शीख समाजाकडून विरोध होत असताना बोर्डाची पहिली बैठक १ एप्रिल रोजी ठेवण्यात आली होती़ या बैठकीलाही शीख समाजातील अनेकांनी विरोध केला होता़ त्यानंतर प्रशासनाने आचारसंहिता असल्याचे कारण देत ही बैठक रद्द केली़
सचखंड गुरुद्वारा बोर्डावर यापूर्वी निवडून गेलेल्या सदस्यांमधून अध्यक्षांची निवड करण्याची परंपरा होती़ परंतु राज्य शासनाने गुरुद्वारा बोर्डाच्या नियमामध्ये बदल केला़ त्यामधील कलम ११ नुसार गुरुद्वारा बोर्डावर अध्यक्ष निवडीचे अधिकार शासनाने आपल्याकडे घेतले होते़ त्यानंतर गुरुद्वारा बोर्डावर शासनाने अध्यक्षांची निवड केली होती़ या निवडीला शीख समाजातून मोठा विरोध करण्यात आला़
पंजप्यारे साहिबान यांनीही अशाप्रकारे गुरुद्वाराच्या कामकाजात शासनाचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा दिला होता़ अध्यक्षांच्या निवडीनंतर १ एप्रिल रोजी अडीच वाजता एस़जी़पी़सी़ विश्रामगृह येथे पहिली बैठक आयोजित करण्यात आली होती़
परंतु, या बैठकीच्या आयोजनालाही विरोध दर्शविण्यात येत होता़ या बैठकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो अशा आशयाचे निवेदनही कुलप्रितसिंग कुंजीवाले या सदस्याने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिले होते़ त्यामुळे प्रशासनाने याबाबतचा निर्णय घेतला़
त्यामध्ये आचारसंहिता असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला होता़ त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ मार्च रोजी ही बैठक रद्द केल्याचे पत्र काढले़ त्यामध्ये सध्या आचारसंहिता सुरु असून बैठकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडून त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती़ पुढे होणाऱ्या बैठकीची तारीख कळविण्यात येईल, असेही त्यात नमूद आहे़