आधी दारू पाजली, नंतर गळा चिरून दिले पेटवून; बाईक देत नसल्याच्या रागातून मित्राची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 07:46 PM2022-11-21T19:46:25+5:302022-11-21T19:46:53+5:30
अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे उकलले गूढ
नांदेड : बिलोली तालुक्यातील सगरोळी शिवारात काही दिवसांपूर्वी एका पुरुषाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने या प्रकरणाचे गूढ उकलले. मित्राने दुचाकी न दिल्यामुळे त्याला दारू पाजून मित्रानेच खून केल्याचे उघडकीस आले. या प्रकरणातील आरोपीला तेलंगणा सीमेवरील कार्ला चेकपोस्ट येथून अटक करण्यात आली.
८ नोव्हेंबर रोजी सगरोळी शिवारातील जंगलात अर्धवट जळालेले पुरुषाचे प्रेत आढळले होते. त्यामुळे खळबळ उडाली होती. या प्रकरणात पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला होता. पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. द्वारकादास चिखलीकर यांनी तपासासाठी दोन पथके स्थापन केली होती. अर्धवट जळालेल्या प्रेताची ओळख अन् मारेकऱ्याला पकडणे, असे दुहेरी आव्हान पोलिसांसमोर होते. शास्त्रशुद्ध पद्धतीने पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला.
१९ नोव्हेंबरला पोनि. चिखलीकर यांना मारेकरी महाराष्ट्र अन् तेलंगणा सीमेवरील कार्ला चेकपोस्ट येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी लगेच त्या ठिकाणी धाव घेऊन महेंदर बोब्बासानी, रा. झेंडा गल्ली, मिर्झापूर जि. कामारेड्डी या आरोपीला अटक केली. अटकेनंतर खुनाबाबत पोलिसांनी विचारपूस केली असता, त्याने धक्कादायक माहिती दिली. बोब्बासानी याने त्याचा मित्र गणेश व्यंकय्या चंचू, रा. नसरुल्लाबाद याला दुचाकी मागितली होती; परंतु त्याने दुचाकी देण्यास नकार दिला. त्याचा राग मनात ठेवून बोब्बासानी याने चंचू याला दारू पाजली. त्यानंतर सगरोळीच्या जंगलात त्याला आणले. या ठिकाणी त्याच्या गळ्यावर ब्लेडने वार केले, तसेच डोक्यावर हेल्मेट मारून त्याचा खून केला. पेट्रोल टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला; परंतु चंचू यांचा मृतदेह अर्धवट जळाल्याने त्याने तेथून काढता पाय घेतला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या या पथकात सपोनि पांडुरंग माने, पोउपनि सचिन सोनवणे, पोहेकॉ गुंडेराव करले, संजय केंद्रे, शंकर म्हैसनवाड, देवा चव्हाण, महेश बडगू, मोतीराम पवार, तानाजी येळगे, बजरंग बोडके, रवी बाबर, राजू सिटीकर, दीपक ओढणे, अच्युत मोरे, हेमंत बिचकेवार, दादाराव श्रीरामे यांचा सहभाग होता.
सीमावर्ती गावांमध्ये केली चौकशी
अर्धवट जळालेला मृतदेह सापडल्यानंतर त्याच्याशी मिळती-जुळती व्यक्ती काही दिवसांपासून मिसिंग आहे का, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सीमावर्ती भागातील प्रत्येक गावात घरोघरी जाऊन, तसेच पोलिस ठाण्यांमध्ये चौकशी केली. सभोवतालच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरेही तपासले होते.