नांदेडमध्ये होणार राज्यातील पहिले उर्दू घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 12:42 AM2018-04-03T00:42:11+5:302018-04-03T00:42:11+5:30
राज्यातील पहिले उर्दू घर म्हणून नावलौकिक मिळालेला उपक्रम लवकरच कार्यान्वित होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. राज्य शासनाने सदर उर्दू घराचा ताबा जिल्हाधिका-यांकडे देत या घराचे व्यवस्थापन बाह्य यंत्रणेद्वारे करण्यासाठी कर्मचारी नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी निधीही मंजूर करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : राज्यातील पहिले उर्दू घर म्हणून नावलौकिक मिळालेला उपक्रम लवकरच कार्यान्वित होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. राज्य शासनाने सदर उर्दू घराचा ताबा जिल्हाधिका-यांकडे देत या घराचे व्यवस्थापन बाह्य यंत्रणेद्वारे करण्यासाठी कर्मचारी नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी निधीही मंजूर करण्यात आला आहे.
नांदेड शहरात मुस्लिम बांधवांची संख्या लक्षणीय आहे. त्यात देगलूर नाका हा परिसर मुस्लिमबहुुल म्हणून ओळखला जातो. या भागात उर्दू घर उभारावे, अशी तेथील नागरिकांची तसेच नगरसेवकांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. या मागणीची दखल घेत राज्य शासनाने विशेष निधी म्हणून तब्बल ८ कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक सोयी-सुविधा असलेले उर्दू घर उभारले. या घरातील प्रत्येक खोलीमध्ये सोफा, फर्निचरसह वातानुकूलीत यंत्रणा उभारण्यात आली आहे.
दरम्यान, महानगरपालिका निवडणुकीपूर्वी या उर्दू घराचे उद्घाटन करण्याची तयारी प्रशासनाकडून करण्यात आली होती. मात्र उद्घाटन काही होऊ शकले नव्हते. त्यातच सुरक्षेच्या दृष्टीने कसल्याही उपाययोजना नसल्याने मध्यंतरी या घराला लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले होते. तर उर्दू घरातील काही साहित्यांचीही चोरी झाल्याचे पुढे आले होते. या सर्व प्रकारांमुळे उर्दू घराचे पुढे काय होणार? असा प्रश्न सर्वसामान्यांपुढे उभा होता. या अनुषंगाने उर्दू घराच्या व्यवस्थापनासाठी निधीची मागणी करणारा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांनी शासनाकडे पाठविला होता.
शासनाने या प्रस्तावाला हिरवा कंदील देत सदर उर्दू घराचे व्यवस्थापन बाह्य यंत्रणेद्वारे करण्यासाठी कर्मचारीवृंद नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. या व्यवस्थापनापोटी तीन महिन्यांसाठीचा निधी म्हणून ६ लाख ९४ हजार ७९१ रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे.
उपजिल्हाधिकारी ठेवणार उर्दू घरावर नियंत्रण
उर्दूू घराचा ताबा जिल्हाधिकाºयांकडे देण्यात आला असून सदर उर्दू घराचे नियंत्रण व व्यवस्थापन उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाºयांमार्फत करण्याचे निर्देशही शासनाने दिले आहेत. राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे येणा-या काही दिवसांत उर्दू घर कार्यान्वित होण्याची चिन्हे आहेत.
राज्यातील पहिला उपक्रम
राज्यात उर्दू भाषेची वाड्.मयीन प्रगती याबरोबरच मराठी व उर्दू भाषेमधील लेखक, कवी, विचारवंत यांच्यामध्ये सर्जनशील विचारांची देवाणघेवाण व्हावी व त्या माध्यमातून उर्दू भाषेचा विकास व्हावा यासाठी नांदेडमध्ये सदर उर्दू घर उभारण्यात आले आहे़ मदिना-तुल-उलूम शाळेजवळील ७३९० चौरस मीटर इतक्या जागेवर हा उपक्रम राबविण्यात आला असून २०१४ मध्ये सदर उर्दू घराची पायाभरणी करण्यात आली होती़