राज्यातील पाच जिल्ह्यांना हत्तीरोगाचा धोका; आरोग्य यंत्रणा सक्रिय, कशामुळे होतो हा रोग?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 12:01 PM2024-03-26T12:01:10+5:302024-03-26T12:02:35+5:30
प्रतिबंधात्मक औषधी वर्षातून एकदा सलग पाच वर्षे घेतल्यास हा आजार दूर करणे शक्य आहे.
नांदेड : राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये हत्तीरोगाचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या जिल्ह्यांत हत्तीरोग निर्मूलन राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत नागरिकांना घरोघरी जाऊन प्रतिबंधात्मक औषधींचे वाटप केले जाणार आहे. या मोहीमत ४५ लाख नागरिकांना औषधी वाटप करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नांदेड या ५ जिल्ह्यांत ही मोहीम राबविली जाणार आहे. या कार्यक्रमाअंतर्गत भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांना डीईसी, अल्बेंडाझोल आणि इवरमेक्टिन ही तीन औषधी देण्यात येणार आहेत. गोंदिया आणि नांदेड जिल्ह्यात डीईसी आणि अल्बेंडाझोल ही दोन औषधे दिली जातील. प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी बूथवर आणि घरोघरी भेटी देऊन पूर्वनिश्चित डोसनुसार ही औषधे वाटप करणार आहेत. राज्याला हत्तीरोगापासून मुक्त करण्यासाठी प्रभावी आंतरक्षेत्रीय समन्वयाद्वारे सुमारे ४५ लाख ३४ हजार ६५३ व्यक्तींना हत्तीरोग (फायलेरिया) प्रतिबंधक औषधी देण्याचे उद्दिष्ट आरोग्य यंत्रणेकडून निर्धारित केले आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती नागरिकांना औषधी...
हत्तीरोगापासून बचावासाठी प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांकडून चंद्रपूर- ११ लाख ६१ हजार ४०४, भंडारा- २ लाख ७२ हजार ८३३, गोंदिया- ८ लाख ९६ हजार १५७, नांदेड- १९ लाख ४८ हजार ६१२ आणि गडचिरोली जिल्ह्यातील २ लाख ५५ हजार ६४७ नागरिकांना अँटी-फायलेरियल औषधी देण्यात येणार आहे.
अशी असतील पथके
जिल्हा - पर्यवेक्षक-रॅपीड रिस्पॉन्स टीम
चंद्रपूर - १७७ -४५
भंडारा- १२८ -५
गोंदिया- १२८ -१३४
नांदेड- ३८६ -५२
गडचिरोली-२०४-११
एकूण- १०२४ -२४७
औषधीचा दुष्परिणाम नाही :
हत्तीरोग (फायलेरियासिस) प्रतिबंधक औषधी घेतल्याने कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. ही औषधी सुरक्षित असून उच्च रक्तदाब, मधुमेह, संधिवातग्रस्त व्यक्तींनी ती घेतली पाहिजे. औषधी घेतल्यानंतर लाभार्थ्याला अडचणी आल्यास, रॅपिड रिस्पॉन्स टीम मदतीसाठी असणार आहे.
कशामुळे होतो हत्तीरोग?
क्युलेक्स, मांसोनिया संक्रमित डास चावल्याने फायलेरिया (हत्तीरोग) हा गंभीर आजार होतो. यामध्ये लिम्फॅटिक सिस्टमला हानी पोहोचते. याला प्रतिबंध न केल्यास, शरीराच्या अवयवांमध्ये अत्यंत सूज येते. जगातील १९ देशांमध्ये हत्तीरोगाचे निर्मूलन झाले असून, १० देश निर्मूलनाच्या जवळ आहेत. प्रतिबंधात्मक औषधी वर्षातून एकदा सलग पाच वर्षे घेतल्यास हा आजार दूर करणे शक्य आहे.
यांना दिली जाणार नाही औषधी
फायलेरियासिसपासून लोकांचा बचाव करण्यासाठी निवडक पाच जिल्ह्यांमध्ये औषधी वाटप होणार आहेत. ही औषधी रिकाम्या पोटी घेऊ नयेत, तसेच २ वर्षांखालील मुले, गरोदर महिला आणि गंभीर आजारी व्यक्तींना ही औषधी दिली जाणार नाहीत.
- डॉ. राधाकिशन पवार, राज्य कार्यक्रम अधिकारी, फायलेरिया निर्मूलन.