हाळणी, कुपटीत अचानक लागलेल्या आगीत पाच घरे भस्मसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 06:11 PM2019-05-02T18:11:03+5:302019-05-02T18:11:44+5:30
संसारोपयोगी साहित्य खाक झाल्याने चार कुटुंबे उघड्यावर आली आहेत़
मुक्रमाबाद (जि़नांदेड) : मुक्रमाबाद येथून जवळच असलेल्या मुखेड तालुक्यातील हाळणी येथे मंगळवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत चार घरे जळून भस्मसात झाली़ या दुर्घटनेत संसारोपयोगी साहित्य खाक झाल्याने चार कुटुंबे उघड्यावर आली आहेत़
हाळणी येथील हणमंत यादवराव नामाजी, प्रकाश यादवराव नामाजी, विलास यादवराव नामाजी आणि पुष्पा नारायण नामाजी या शेतकऱ्यांच्या घरांचेआगीत नुकसान झाले़ गावातील बाळु मामा मंदिर येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरु आहे. याठिकाणी सुरू असलेल्या कीर्तनासाठी घरातील महिला, पुरुष गेले होते. तर उन्हाळ्यामुळे काहीजण अंगणात झोपले होते. रात्री उशीरा या चार शेतकरी कुंटूबांच्या घरांना अचानक आग लागली. आगीने झपाट्याने रौद्ररुप धारण केल्याने चारही घरे जळून खाक झाली. उदगीर येथील अग्निशामक दलाची गाडी मागविण्यात आली़ मात्र तोपर्यंत या चारही घरांचे मोठे नुकसान झाले होते़ मुक्रमाबाद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कमलाकर गडीमे, जमादार सुरनर यांनी तसेच तलाठी एम़जी़ जमदाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला़ यावेळी दत्ता पाटील, गोपाळ पाटील, हणमंत मलापुरे, जळबा देवकत्ते, काशीनाथ राठोड उपस्थित होते.
दरम्यान माहूर तालुक्यातील कुपटी येथे दिलीप चोखाजी कवडे यांच्या राहात्या शेतातील घराला मंगळवारला दुपारी दोनच्या सुमारात अचानक लागलेल्या आगीत जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान झाले़ यात स्प्रीकरचे ४० पाईप, बैलगाडी, गहू, ज्वारी, घरातील एलसीडी, फॅन, चना, कांदे, लसुण, घराचे दारे, खिडक्या व शेतातील पूर्ण साहित्य जळून खाक झाले़ घरामध्ये पूर्ण कुटूंब दुपारच्या वेळेस आराम करात होते. घरातील सिलेंडर, शेगडी पूर्णपणे जळून खाक झाली़ गावातील एका व्यक्तीने धाडस करुन ते सिलेंडर टाकी घराच्या पत्रावरुन जावून बाहेर काढली़ त्यामुळे मोठी जीवीत हानी टळळी़ घराला आग लागताच गावातील नागरीक धावून आले़ मात्र वाऱ्याचा जोर जास्त असल्याने आग विजविण्यास विलंब लागला़ तोपर्यंत घरातील साहित्य जळून खाक झाले होते़
आगीत ८७ लाखांचे बगॅस खाक
लक्ष्मीनगर येथील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना परिसरातील बगॅसला आग लागून ८७ लाखाचे नुकसान झाले़ लक्ष्मीनगर देगाव-येळेगाव येथील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना परिसरातील बगॅसला ३० एप्रिल रोजी तापमान वाढलेले असताना दुपारी १़४५ च्या सुमारास अचानक आग लागली़ या आगीमध्ये कारखान्याचे सुमारे सात हजार मे़टन बगॅस जळून खाक झाला़ या आगीमध्ये कारखान्याचे अंदाजे ८७ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कारखाना प्रशासनाने व्यक्त केला आहे़ या घटनेप्रकरणी विनायक कदम यांच्या तक्रारीवरून बारड पोलिस ठाण्यात प्रकरणाची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास ए.एस.आय.सावंत करीत आहेत.