दहा दिवसांत कोरोना रुग्ण पाच हजारांच्या घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:16 AM2021-03-20T04:16:53+5:302021-03-20T04:16:53+5:30
दहा दिवसांमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे. यामध्ये १० मार्च रोजी २१९ जणांना संसर्ग झाला. त्याचबरोबर ११ मार्च रोजी ...
दहा दिवसांमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे. यामध्ये १० मार्च रोजी २१९ जणांना संसर्ग झाला. त्याचबरोबर ११ मार्च रोजी २५० रुग्ण, १२ रोजी ३६० रुग्ण, १३ मार्च रोजी ५९१ रुग्ण, १४ रोजी ५६६ रुग्ण, १५ मार्च रोजी ४१४, १६ रोजी ५५२, १७ रोजी ५९७, १८ रोजी ६२५ तर १९ मार्च रोजी या महिन्यातील ६९७ रुग्ण आढळूून आले. मागील महिनाभरापासून दररोज दोन ते तीन हजार रुग्णांची तपासणी केली जात आहे. त्यात मागील आठ दिवसात दरराेज पाचशेहून अधिक रुग्ण सापडत आहेत. तर मृत्यूचे प्रमाणही वाढलेले आहे. त्यामुळे नागरिकांनी कोराेना संसर्ग रोखण्यासाठी दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.
राज्यातच नव्हे तर देशात सर्वाधिक रुग्ण आढळणाऱ्या शहरामध्ये नांदेडची नोंद झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटणकर यांच्यासह पोलीस व महसूल प्रशासनाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून विविध नियमावली ठरवून दिली आहे. त्याचबरोबर विविध दुकाने, हॉटेल्स, बार, प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जिल्ह्यात नियमावली घालून देऊनही आणि अटी घालूनदेखील लग्न समारंभ, राजकीय कार्यक्रमांना होणारी गर्दी कमी होण्याचे नाव नाही. त्यामुळे प्रत्येक तहसीलदार यांनी पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासनाच्या मदतीने प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी नागरिकांना आवाहन करावे, वेळप्रसंगी गुन्हे दाखल करून कार्यवाहीदेखील करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटणकर यांनी दिल्या आहेत.