पाच हजार कोविड रुग्णांवर जनआरोग्यमध्ये मोफत उपचार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:18 AM2021-05-20T04:18:43+5:302021-05-20T04:18:43+5:30
नांदेड : कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक भयंकर निघाली. अनेक रुग्णालयांमध्ये खाटा मिळत नव्हत्या. रुग्णांनाही लाखो रुपयांची बिले ...
नांदेड : कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक भयंकर निघाली. अनेक रुग्णालयांमध्ये खाटा मिळत नव्हत्या. रुग्णांनाही लाखो रुपयांची बिले द्यावी लागत होती. त्यामुळे शासनाने महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत कोरोना रुग्णांवर उपचारास सुरुवात केली. परंतु सुरुवातीच्या काळात कोरोना रुग्णांपेक्षा नॉन कोविड रुग्णांची संख्या अधिक होती. त्यामुळे योजनेत सहभागी असलेल्या अनेक रुग्णालयांनी कोविड रुग्णांवर उपचार करण्यास नकार दिला होता. त्याचबरोबर कोरोना रुग्णालयाच्या नियम आणि अटींमध्येही काही रुग्णालये बसत नव्हती. त्यानंतर दुसऱ्या लाटेत मात्र योजनेतील रुग्णालयांनी त्यासाठी पुढाकार घेतला. आतापर्यंत जिल्ह्यात योजनेअंतर्गत कोरोनाच्या ४ हजार ४ हजार ६५४ रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. आजघडीला योजनेतील शासकीय नऊ आणि खाजगी दहा अशा १९ रुग्णालयांत कोरोना रुग्णांवर उपचार केले जातात. तर कोरोना नसलेल्या १९ हजार ४८७ रुग्णांवर या काळात इतर आजारांचे उपचार मोफत करण्यात आले आहेत. जनआरोग्य योजनेमुळे अनेक गरजूंना फायदा मिळाला.
जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचारासाठी योजनेतील रुग्णालयांना २० हजार आणि ४० हजारांचे पॅकेज देण्यात आले आहे. त्यातही २० हजार हे विना व्हेंटिलेटर दहा दिवस आणि ४० हजार व्हेंटिलेटरवर दहा दिवस असे दर ठरविले आहेत.
परंतु प्रत्यक्षात खाजगी रुग्णालयांनी हे दर परवडत नसल्याने अशा रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ करणे सुरू केले होते. त्यामुळे सहा रुग्णालयांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या पॅकेजमध्ये महागडी औषधी आणि इतर महागड्या तपासण्यांचा समावेश नाही. तरीसुद्धा नांदेडात योजनेत सहभागी असलेल्या काही रुग्णालयांनी योजनेतील रुग्णांना चांगली सेवा दिल्याचे दिसून येत आहे.
- जनआरोग्य योजनेअंतर्गत कोरोना झाल्यानंतर म्युकरमायकोसिसचा संसर्ग झालेल्या २५ रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. या उपचारासाठीचे १५ हजारांचे पॅकेज योजनेत समाविष्ट आहे. या सर्व रुग्णांवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले असल्याची माहिती आहे.