घोरपड विक्री करण्याच्या तयारीतील चौघांना वनविभागाने केले जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 02:44 PM2020-07-27T14:44:14+5:302020-07-27T14:44:46+5:30
गुप्त माहितीच्या आधारे वनविभागाची कारवाई
नांदेड : वन्य प्राणी असलेल्या घोरपडीची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना वनविभागाने रविवारी रात्री अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथे जेरबंद केले.
मालेगाव येथे काहीजण घोरपड विक्री करीत असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली. ही माहिती मिळताच नांदेड वनपरिक्षेत्राचे पथक मालेगावला पोहोचले. सापळा रचून या पथकाने डी.पी. डुकरे, शंकर मुकिन्दराव कांबळे, मोहन भिकाजी लोखंडे सर्व रा. चाभरा ता.हदगाव आणि रमेश सीताराम वाघमारे या चौघांना जेरबंद केले. या कारवाईत वनपाल पी.ए. धोंडगे, डी.ए. हक्कदाळे, वनरक्षक घुगे, अलोने, काकडे आदींचा समावेश होता.
शिकार करणारे रॅकेट असण्याची शक्यता
घोरपड हा वन्यप्राणी भारतीय वन्यजीव सरंक्षण अधिनियम अंतर्गत अनुसूची 1 मधील आहे. घोरपड पकडणे, विक्री करणे, मांस खाणे हा गुन्हा आहे. त्याचवेळी कोणत्याही वन्यप्राण्याची शिकार करणे, तस्करी करणे, त्यांचे अवयव ताब्यात ठेवणे गुन्हा आहे. दरम्यान, घोरपडीची शिकार जिल्ह्यात अनेक भागात सर्रासपणे केली जाते. घोरपडीचे मांस हे कमरेसाठी उपयुक्त मानले जाते. त्यामुळे घोरपड दिसताच शिकार केली जाते. काही ठिकाणी ती विक्रीही केली जाते. घोरपडीची शिकार करणारे हे रॅकेट असल्याची शक्यताच वनविभागाने मालेगाव येथील कारवाईनंतर व्यक्त केली आहे. हे रॅकेट शोधून काढणार असल्याचेही वनविभागाने स्पष्ट केले आहे.