Video: धावत्या रेल्वेत चढणे चौकीदाराच्या अंगलट; पाय तुटला, उपचारास नेताना मृत्यू
By प्रसाद आर्वीकर | Published: August 23, 2023 06:26 PM2023-08-23T18:26:20+5:302023-08-23T18:30:29+5:30
धावत्या रेल्वेत चढत असताना, रेल्वे प्लॅटफॉर्मवर पाय घसरल्याने झाला अपघात
- गोकुळ भवरे
किनवट : आदिलाबाद ते नांदेड या धावत्या इंटरसिटी गाडीत किनवट रेल्वे स्थानकातून चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या सीरमेटी येथील महेश कनाके यांचा पाय घसरल्याने रेल्वेखाली आल्याची घटना आज सकाळी ९.४५ वाजता घडली. यात डावा पाय तुटून गंभीर जखमी झालेल्या महेशचा उपचारासाठी नागपूरला नेत असताना आज दुपारी ३ वाजेच्या दरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, धावत्या रेल्वेत चढतानाची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे.
महेश (महेंद्र) कनाके हा सिरमेटी येथील असून, तो किनवट येथे राहायला आहे. तो वनविकास महामंडळ वनप्रकल्प विभाग किनवट येथे चौकीदार म्हणून कार्यरत आहे. तो २३ ऑगस्ट रोजी सकाळी किनवट येथून नांदेडला जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर आला. आदिलाबाद ते नांदेड या इंटरसिटीने नांदेडला जाण्यासाठी किनवट येथून धावत्या रेल्वेत चढत असताना, रेल्वे प्लॅटफॉर्मवर पाय घसरला. दोन-तीन पलट्या मारून तो रेल्वेखाली आला. सुदैवाने जीव वाचला. मात्र, त्याचा डावा पाय तुटला. उजव्या पायालाही मार लागून डोक्यालाही दुखापत झाली.
नांदेड: धावत्या रेल्वेत चढणे पडले महागात, डाव्या पायाचा पडला तुकडा, उपचारास नेताना मृत्यू. किनवट रेल्वे स्थानकातील घटना pic.twitter.com/zBJ7dV4jFo
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) August 23, 2023
महेशला जखमी अवस्थेत गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉ.आर.एस. ढोले यांनी उपचार केला. दरम्यान, आदिलाबाद येथून नागपूरला उपचारासाठी नेताना पांढरकवडा नजीक वाटेतच दुपारी ३ च्या सुमारास महेश कनाकेची प्राणज्योत मालवली अशी माहिती आहे.