कोरोना साथीचा स्वारातीम विद्यापीठाला विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:12 AM2021-03-29T04:12:08+5:302021-03-29T04:12:08+5:30
नांदेडमध्ये कोरोना साथीचा उद्रेक झाला आहे. २४ तारखेच्या मध्यरात्रीपासून कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर ...
नांदेडमध्ये कोरोना साथीचा उद्रेक झाला आहे. २४ तारखेच्या मध्यरात्रीपासून कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर निघू नये, असे आदेश आहेत. दररोज हजाराच्या आसपास रुग्ण निघत असल्याने शाळा, महाविद्यालये, शिकवण्या वर्ग बंद करण्यात आले आहेत. ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा अवलंब सर्वत्र केला जात असताना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. ज्ञानोबा मुंडे यांनी काढलेले एक पत्र चर्चेला तोंड फोडणारे ठरले आहे.
यूजीसीने पाठवलेल्या एका पत्राचा आधार घेत विद्यार्थी कल्याण विभागाने विद्यापीठाच्या अधीनस्त सर्व महाविद्यालांना पत्र पाठविले आहे. न्यू दिल्ली येथे राष्ट्रीय युद्ध स्मारक उभारण्यात आले आहे. तसेच राष्ट्रीय पोलीस स्मारकही लगतच उभारण्यात आले आहे. या दोन्ही स्मारकांना भेटी देऊन विद्यार्थ्यांना माहिती द्यावी, असे त्यांनी म्हटले आहे. सैनिक आणि पोलिसांनी दाखवलेल्या शौर्याची गाथा विद्यार्थ्यांना माहीत असावी, हा प्रेरणादायी इतिहास विद्यार्थ्यांना कळावा, हे योग्य मानले तरी कोरोना साथीचा बहर सुरू असताना विद्यापीठातून हे पत्र काढण्यात आले आहे.
दरम्यान, यूजीसीने देशातील सर्वच विद्यापीठांना असे पत्र पाठविले आहे. नांदेडला काय परिस्थिती आहे, हे त्यांना अवगत नसावे; पण नांदेड जिल्ह्यातील परिस्थितीची जाणीव विद्यापीठाला नाही का, येथील महाविद्यालये पूर्णता बंद आहेत. याचा विसर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी विभागाला पडला असावा, अशी चर्चा होत आहे.