नांदेडातून २० मार्चपासून विमान करणार उड्डाण, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची माहिती
By रामेश्वर बालाजीराव काकडे | Published: March 4, 2024 10:36 PM2024-03-04T22:36:00+5:302024-03-04T22:36:07+5:30
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले होते आश्वासन
नांदेड: रिलायन्सच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे नांदेड येथील विमानसेवा बंद पडली होती. पण, यासंदर्भात सातत्यपूर्ण केलेल्या पाठपुराव्यामुळे हैदराबाद, नागपूर व दिल्ली जवळील हिंडन येथे २० मार्चपासून विमानसेवा सुरू होण्यास हालचाली सुरू आहेत, अशी माहिती माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खा. अशोकराव चव्हाण यांनी दिली.
गुरुत्ता गद्दीच्या काळात नांदेड येथील श्री गुरुगोविंद सिंघजी विमानतळाचे आधुनिकीकरण व विस्तारीकरण करण्यात आले. त्यानंतर अनेक विमान कंपन्यांनी मुंबई, दिल्ली, हैदराबाद, जयपूर या ठिकाणी विमानसेवा दिली. परंतु त्यानंतर नांदेड येथील श्री गुरु गोविंदसिंघजी विमानतळावरील विमानसेवा मागील काही वर्षांपासून बंद पडली. या विमानतळाचे व्यवस्थापन रिलायन्स कंपनीकडे देण्यात आले होते. विमानतळावरील सोयीसुविधा देण्यामध्ये ही कंपनी असमर्थ ठरली. त्यामुळे नांदेड येथून अन्य शहरांशी जोडल्या जाणारी विमानसेवा खंडित झाली. त्यामुळे या विमानतळाचा विमानसेवा परवाना रद्द करण्यात आला.
या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी ही विमानसेवा पुन्हा सुरळीत सुरू व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू केले. नागरी उड्डयानमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेटही घेतली. खासगी विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांशी त्यांनी प्रत्यक्ष बोलणी केली. दरम्यानच्या काळात विमान प्राधिकरणाने नांदेड विमानतळाचा वाहतूक परवाना पुन्हा बहाल केला. खा. चव्हाण यांनी महाराष्ट्रातील घोडावत कंपनी संचालित स्टार इअर या कंपनीशी संपर्क साधून ही विमानसेवा नव्याने सुरू करण्याची मागणी केली. त्यांच्या या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत स्टार इअरलाइन्सने नांदेड येथून हैदराबाद, नागपूर व दिल्ली जवळील हिंडन येथे विमानसेवा सुरू करण्याची तयारी केली आहे. येणाऱ्या २० मार्चपासून ही विमानसेवा सुरू होणार आहे.
नांदेड येथे पुन्हा एकदा विमानसेवा सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर खा. अशोकराव चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले असून नांदेडला देशातील इतर प्रमुख शहरांशी विमानसेवेने जोडल्या गेल्यानंतर जिल्ह्याच्या विकासाची निश्चित गती वाढेल, असा विश्वास व्यक्त करतानाच त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व नागरी उड्डयानमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे आभार मानले आहेत.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले होते आश्वासन
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे नांदेड येथे आले असता, त्यांनी नांदेड येथील बंद पडलेली विमानसेवा पूर्ववत सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. पण, अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर का होईना, अखेर नांदेड येथून विमानसेवेला प्रारंभ होणार आहे.