भुईकोट किल्ल्याच्या बुरुजाला पडल्या भेगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 12:19 AM2019-03-18T00:19:43+5:302019-03-18T00:20:17+5:30
ऐतिहासिक राष्ट्रकुटकालीन भुईकोट किल्ला वास्तू देखणी अन् नजरेत भरणारी आहे. पर्यटक, इतिहासप्रेमींना भुरळ घालणारा बाराशे वर्षांचा किल्ला नवीन समस्येने ग्रासला आहे. बाहेरील चारही दिशेने किल्ला- बुरूजाला उभ्या भेगा पडल्या असल्याचे समोर आले आहे. ऐतिहासिक प्रसिद्ध ठेवा भुईसपाट होण्याचा धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गंगाधर तोगरे।
कंधार : ऐतिहासिक राष्ट्रकुटकालीन भुईकोट किल्ला वास्तू देखणी अन् नजरेत भरणारी आहे. पर्यटक, इतिहासप्रेमींना भुरळ घालणारा बाराशे वर्षांचा किल्ला नवीन समस्येने ग्रासला आहे. बाहेरील चारही दिशेने किल्ला- बुरूजाला उभ्या भेगा पडल्या असल्याचे समोर आले आहे. ऐतिहासिक प्रसिद्ध ठेवा भुईसपाट होण्याचा धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कंधारला समृद्ध असा वैभवशाली ऐतिहासिक वारसा लाभला आहे. नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या शहराला राष्ट्रकुटकालीन राजानी देखणी किल्ला वास्तू, निर्माण केली. तसेच अनेक राजे व किल्लेदारांनी किल्ल्यात नवीन वास्तूची भर टाकली. राष्ट्रकुट राजा या नगराला नटवले. जवळ आले तरच नजरेला दिसणारे कंधार एक जाज्वल्य इतिहास जागवते. वर्षाला लाखो पर्यटक याचा अनुभव घेतात. भुईकोट किल्ला सतत पर्यटक, विद्यार्थ्यांनी गजबजलेला असतो. किल्ल्यातील नानाविध वास्तू पाहताना तो रममाण होतो.
यापूर्वी किल्ला बुरूज ढासळले होते. त्याची पुनर्बांधणी करून वारसा जतन करण्याचा प्रश्न ‘लोकमत’ने ऐरणीवर आणला. यासाठी निधी उपलब्ध झाला व दुरूस्ती झाली. परंतु आजस्थितीत पूर्व, पश्चिम, दक्षिण व उत्तर या दिशेला बाहेरील किल्ला-बुरूजाला मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे किल्ला ढासळण्याचा पुन्हा धोका वाढला आहे.
कोट्यवधीचा निधी खर्च करून विकासकामे झाली. तरीही अनेक सुविधांची मोठी वाणवा आहे. पिण्याचे पाणी, विद्युत रोषणाई, बगीचा, गाईड, मनुष्यबळ, कोरडा खंदक, पोलीस चौकी, खंदकात झाडा झुडपाचे वाढलेले प्रमाण, किल्ल्यावरील वृक्षाचे समूळ उच्चाटन आदी समस्यांने किल्ला हा पर्यटक, इतिहासप्रेमी, नागरिक, संशोधक, विद्यार्थ्यांत सतत चर्चेत असतो. आता बुरूजाला पडलेल्या उभ्या भेगा तात्काळ दुरूस्ती करत वास्तू ,जतन करण्याची गरज आहे. अन्यथा किल्ला भुईसपाट होण्याचा धोका आहे. किल्ल्यातील अनेक वास्तुना झळाळी आली आहे. त्यामुळे पर्यटकांना दिलासा मिळाला आहे. तसा बुरूज दुरूस्तीने द्यावा. अन्यथा या भेगा अधिक रूंदावत जातील. आणि किल्ला खिळखिळा होऊन भुईसपाट होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
अनेक वास्तूंचे काळाच्या ओघात भग्नावशेष
किल्ल्यात असलेल्या अनेक वास्तूंचे काळाच्या ओघात भग्नावशेष झाले. तरीही अनेक वास्तू मात्र तग धरून आहेत.विविध योजनेतून किल्ल्यात मोठी डागडुजी केली. आणि किल्ला पूर्ववैभवात नेण्यासाठी प्रयत्न झाले. यासाठी गत दीड दशकांपेक्षा अधिक काळ ‘लोकमत’ यासाठी सातत्याने संबंधित विभागाचे लक्ष वेधते. मोठ्या निधीतून किल्ला परिसर व आतील अनेक वास्तूचे सौंदर्य जतन केले. अनेक वास्तूची डागडुजी, रस्ते आदी कामांवर खर्च केला. त्यामुळे किल्ला विकासात भर पडली.