जिल्ह्यात चार दुचाकी चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:14 AM2021-07-01T04:14:23+5:302021-07-01T04:14:23+5:30
आठवडी बाजारातून मोबाईल लंपास जुना कौठा भागात रमेश बाबाराव भोसले हे भाजीपाला खरेदी करीत असताना त्यांची नजर चुकवून चोरट्याने ...
आठवडी बाजारातून मोबाईल लंपास
जुना कौठा भागात रमेश बाबाराव भोसले हे भाजीपाला खरेदी करीत असताना त्यांची नजर चुकवून चोरट्याने खिशातील २० हजार रुपयांचा मोबाईल लंपास केला. ही घटना २९ जून रोजी घडली. या प्रकरणात नांदेड ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
दारूसाठी पैसे न दिल्याने हल्ला
वाजेगाव भागातील पुलाखाली बसलेल्या दोघांवर हल्ला करण्यात आला. मोहम्मद अखील मोहम्मद इब्राहिम हे मित्रासोबत पुलाखाली बसले होते. यावेळी तेथे आलेल्या अब्दुल मजहर याने दारूसाठी पैशाची मागणी केली. मोहम्मद खलील यांनी देण्यास नकार दिल्यानंतर चाकूने हल्ला करण्यात आला.
पायगुणाचे टोमणे मारून छळ
पायगुण चांगला नसल्यामुळे घराची भरभराट होत नसल्याचे टोमणे मारून विवाहितेचा छळ करण्यात आला. या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पीडित महिलेला २००६ पासून सासरच्या मंडळींनी मूलबाळ होत नसल्याने त्रास देणे सुरू केले होते. शरीराने कमजोर आणि अपयशी पायाची असल्याचे टोमणे मारून सेंट्रींगच्या व्यवसायासाठी माहेराहून दोन लाख रुपये घेऊन येण्याची मागणी केली. या प्रकरणात राजू संभाजी गुळवे, संभाजी गुळवे, कामाजी गुळवे, अरुण गुळवे, वैशाली गुळवे, उषा गुळवे, लताबाई गुळवे, मिराबाई गुळवे, भाग्यश्री गुळवे यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला.
पत्नी दारू पित नसल्याने त्रास
पत्नी दारू पित नाही, मांसाहार करीत नाही या कारणावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. ही घटना कामारेड्डी जिल्ह्यातील बिकनूर येथे घडली. या प्रकरणात धर्माबाद पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
धर्माबाद येथील मुलीला बिकनूर येथे देण्यात आले हाेते. परंतु सासरच्या मंडळींनी तू काळी आहेस म्हणून हिणवले. त्यानंतर दारू पित नाहीस, मांसाहार करीत नाहीस म्हणून त्रास देण्यास सुरुवात केली. तुझ्या वडिलांची संपत्ती पाहूनच आम्ही लग्न केले. आता घर बांधकामासाठी माहेराहून पाच लाख रुपये घेऊन ये म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी श्रावण कुमार गौड, नटराज गौड, उमादेवी गौड, श्रवंती बोगडा, मनिषा गौड यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला.