नांदेड जिल्ह्यासाठी चार दिवसांचा यलो अलर्ट; विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
By प्रसाद आर्वीकर | Published: June 1, 2024 02:53 PM2024-06-01T14:53:49+5:302024-06-01T14:58:09+5:30
प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेल्या शक्यतेनुसार जिल्ह्यात नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
नांदेड : भारतीय हवामानशास्त्र विभागाने जिल्ह्यासाठी २ ते ५ जून या काळात येलो अलर्ट जारी केला असून विजेच्या कडकडाट्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.
सद्यस्थितीला उन्हाचा पारा वाढलेला आहे. दररोज ४० अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद होत आहे. उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या वर्षीच्या पावसाळ्यातील मान्सून केरळमध्ये दाखल झाला असून, १० ते १२ जूनपर्यंत तो राज्यात सक्रिय होण्याची शक्यता असते. येथील शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मुंबईच्या प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाने १ जून रोजी दुपारी एक वाजता जिल्ह्यासाठी ४ दिवसांचा यलो अलर्ट जारी केला आहे.
२ ते ५ जून या चार दिवसांमध्ये तुरळ ठिकाणी ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहतील. विजेच्या कडकडाटसह ढगांचा गडगडाट होऊन मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेल्या शक्यतेनुसार जिल्ह्यात नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.