नांदेड जिल्ह्यात चार घरफोड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 12:46 AM2018-10-10T00:46:02+5:302018-10-10T00:46:15+5:30
जिल्ह्यात वेगवेगळ्या चार घरफोडीच्या घटनांमध्ये चोरट्यांनी ३ लाख १८ हजारांचा ऐवज लंपास केला आहे़ याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : जिल्ह्यात वेगवेगळ्या चार घरफोडीच्या घटनांमध्ये चोरट्यांनी ३ लाख १८ हजारांचा ऐवज लंपास केला आहे़ याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मंगळवारी पहाटे डी मार्टजवळील जय रेसिडेन्सीमध्ये ब्रम्हानंद मारोतराव माचेवाड हे ३०३ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये राहतात. माचेवाड हे सोमवारी कौटुंबिक कार्यक्रमासाठी औरंगाबाद येथे गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घर साफ केले. लोखंडी टॉमीने कुलूप तोडून चोरट्यांनी फ्लॅटमध्ये प्रवेश केला. कपाटाचे दार तोडून त्यामध्ये असलेले चार तोळ्याचे सोन्याचे गंठन, दोन तोळ्याचे लहान गंठन, सोन्याची अंगठी, झुमके असा एकुण १ लाख ९५ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला़ या घटनेची माहिती मिळताच भाग्यनगर ठाण्याचे सपोनि डमाले यांनी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. परंतु, श्वानाने मुख्य रस्त्यापर्यंतचाच माग काढला़ त्यानंतर श्वान जागेवरच फिरू लागल्याने पोलिसांचे प्रयत्न निष्फळ ठरले़
दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका प्राध्यापकांचा मोबाईल हिसकावून नेल्याची घटना ताजी असताना एका टिप्परची बॅटरी तसेच दुचाकीमधील पेट्रोल चोरट्यांनी लंपास केले. या परिसरात गेल्या काही दिवसांत भुरट्या चोऱ्या वाढल्या असताना आता चोरट्यांनी बंद घरांकडे आपला मोर्चा वळविला आहे़ या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कंधार तालुक्यातील मंगलसांगवी येथे चोरट्यांनी घर फोडून १ लाख ७ हजारांचा ऐवज लंपास केला़ आनंदा विश्वनाथ कदम यांच्या घराचा कडी-कोंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला होता़ सोन्याचे दागिने आणि रोख ८२ हजार रुपये चोरट्यांनी लांबविले़ याप्रकरणी उस्माननगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ किनवट शहरातील भगतसिंगनगर येथे चोरट्यांनी रोख सोळा हजार रुपये लंपास केले़ अक्षय दीपकराव शिकलवार याच्या आजोबाच्या घरात चोरट्यांनी प्रवेश केला होता़ ही घटना ८ आॅक्टोबर रोजी घडली़ चोरट्याने रोख १६ हजार रुपये आणि बँकेचे जुने पासबुक नेले़ याप्रकरणी किनवट ठाण्यात गुन्हा नोंद झाला़
तर देगलूर तालुक्यातील मौजे गोजेगाव येथील बीएसएनएल टॉवरचे २५ हजार रुपये किमतीचे केबल चोरट्यांनी नेले़ याप्रकरणी संदीप उन्हाळे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंद झाला़