झळकवाडीत चारशे कोंबड्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:15 AM2021-01-14T04:15:19+5:302021-01-14T04:15:19+5:30
नांदेड : किनवट आदिवासी दुर्गम भागातील झळकवाडी या गावामध्ये चारशे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या मृत ...
नांदेड : किनवट आदिवासी दुर्गम भागातील झळकवाडी या गावामध्ये चारशे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या मृत कोंबड्या गावाच्या जवळच टाकल्याने त्याची गावाभोवती दुर्गंधी पसरली असून, या दुर्गंधीमुळे गावातील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राज्यातील शहरी व ग्रामीण भागात बर्ड फ्ल्यू आजाराचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाने शहरी व गाव पातळीवर काम करणाऱ्या पशुसंवर्धन विभागाला अलर्ट राहण्याचे आदेशही दिले आहेत. मात्र, अद्यापपर्यंत या गावांमध्ये कुठलाही पशुसंवर्धन विभागाचा अधिकारी किंवा साधा कर्मचारीही फिरकला नाही. त्यामुळे या गावात कोंबड्यांची मृत्युसंख्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत असून, दिवसाकाठी कोंबड्यांचे मृत्यू वाढतच आहेत. त्यामुळे मृत्यू पडलेल्या कोंबड्या गावाच्या शेजारी रोडच्या कडेला फेकून दिल्याने मरण पावलेल्या कोंबड्यांमध्ये आळ्या लागून गावाभोवती अशी दुर्गंधी पसरली आहे. जवळपास या गावातील चारशे कोंबड्याचा मृत्यू झाल्याची माहिती येथील नागरिक व सरपंच दामाजी तांबारे यांनी दिली आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी हिमायतनगर तालुक्यात शंभरहून अधिक कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर, अनेक तालुक्यातील कोंबड्या आणि कावळ्याचे नमुने भोपाळ येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.