चार एकर शेतीत घेतले चार लाखांचे उत्पन्न; बिलोलीच्या आधुनिक शेतकऱ्याची किमया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 08:26 PM2018-04-09T20:26:37+5:302018-04-09T20:26:37+5:30
बिलोलीच्या महसूल सेवकाने मागच्या ४० वर्षापासून स्वत:च्या मेहनतीने कृतीशील शेती करण्याचा ध्येयवेडा प्रयोग केला आहे़ अवघ्या चार एकर शेतीमध्ये तीन पिकांचे चार लाखांचे उत्पादन दरवर्षी काढून एक नवा आदर्श शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे़
- राजेश गंगमवार
बिलोली (नांदेड ) : एखादी लहान-सहान नोकरी लागली की शेतीला जोड व्यवसाय करून शेती केली जाते़ घरात कमावते झाले की शेती दुसऱ्याला करण्यासाठी किंवा पडीक ठेवण्याची अनेक उदाहरणे आहेत़ पण बिलोलीच्या महसूल सेवकाने मागच्या ४० वर्षापासून स्वत:च्या मेहनतीने कृतीशील शेती करण्याचा ध्येयवेडा प्रयोग केला आहे़ अवघ्या चार एकर शेतीमध्ये तीन पिकांचे चार लाखांचे उत्पादन दरवर्षी काढून एक नवा आदर्श शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे़
येथील माधवराव अंकुशकर १९८० च्या दशकात कोतवाल पदावर रूजू झाले़ सध्या बिलोली तहसील कार्यालयात सेवक म्हणून कार्यरत आहेत़ तुटपुंज्या पगारातच त्यांनी काटकसरीने कुटुंब चालवले़ एका मुलाला एमडी मेडीसीन, तर दुसऱ्याला आयकर अधिकारी बनवले़ दोघेही आज कमावते झाले़ पण लहानपणापासून शेतीचा छंद असलेल्या माधवरावांनी तरूण वयापासूनच नोकरीची सेवा करीत करीत शेतीकडेही लक्ष दिले़ वडिलोपार्जित मिळालेल्या चार एकर कोरडवाहू शेतीचे बागायतीमध्ये रुपांतर केले़
बिलोलीच्या शहरालगत असलेल्या सावळी मार्गावरच्या ४ एकर शेतीमधून आठ महिन्यात तीन वेगवेगळ्या पिकांचे उत्पादन ते घेत असतात़ पावसाळी व उन्हाळी भात पीक, गहू तसेच उन्हाळी भुईमुगाची लागवड करून स्वत: मेहनत करण्यात पहाटे ५ पासून शेतात सतत राबराबत असतात़ म्हणूनच अवघ्या ४ एकरमध्ये ४ लाखांचे दरवर्षी उत्पादन घेत आले आहेत़ याच मार्गावरून जाताना शेतीकडे नजर टाकल्यास उन्हाळ्यातही हिरवेगार-निसर्गरम्य परिसर दिसून येतो़ शेतीची आवड, दररोजची मेहनत, वेळेवर पाणीपुरवठा, शेतीची सर्व कामे करताना वयाच्या ५६ व्या वर्षातही कधीच डगमगत नाहीत़ पावसाळा, हिवाळा, उन्हाळा या तिन्ही हंगामात वेगवेगळी पिके घेऊन शेतीप्रधान भारताचे नागरिक असल्याचे उत्तम उदाहरण त्यांच्याकडे पाहून दिसते़ आजही त्यांच्या शेतात तिन्ही पिके डोलत आहेत़
एका जबाबदारीने दररोजचे शासन टपाल, समन्स अगदी वेळेवर देऊन संबंधितांची पोच कार्यालयात देणे असा दररोजचा नित्य क्रम आहे़ पण सेवक असूनही मुले अधिकारी झाल्याचा आविर्भाव कधीही दाखवत नाहीत़ चार एकर शेतीमधून चार लाखांचे उत्पादन आठ महिन्यात घेणारे क्वचितच शेतकरी आहेत़ पण शासकीय नोकरी करीत करीत पहाटे पाच पासून तीन तास शेती कामे व नंतर आपली ड्युटी असे करणारे लोक अपवाद आहेत़
कठोर श्रमामुळे मुले उच्च पदावर
मुलं उच्च पदावर असली तरी कोणताही मोठेपणा त्यांच्यात दिसून येत नाही़ स्वत:ची शेती करताना लाज कसली असा प्रश्न ते करीत असतात़ आजही महसूल कार्यालयात सेवक पदावर असून खेड्यापाड्यात शासकीय टपाल पोहोचवण्याची त्यांची ड्युटी आहे़ शेतीकडे लक्ष दिल्याने कर्तव्यात कसूर कधीच करीत नाहीत़ कार्यालयीन वेळेत हजर व आपले जवाबदारीचे काम वेळेत पूर्ण असा त्यांचा नियम आहे़