दरोड्याच्या तयारीतील चौघे जेरबंद; १३ लाखांचा मुद्देमाल जप्त, अनेक गुन्हे उघडकीस येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 05:06 PM2022-08-26T17:06:13+5:302022-08-26T17:06:48+5:30
कारवाई दरम्यान चार आरोपी फरार झाले असून पोलीस तपास करत आहेत
नांदेडः दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघांना तब्बल १३ लाख ३३ हजार ७०० रूपयांच्या मुद्देमालासह 'स्थागुशा'च्या पथकाने जेरबंद केले. ही कारवाई २५ ऑगस्ट रोजी रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास नांदेड ग्रामीण ठाण्याच्या हद्दीतील टापरे चौक परिसरात करण्यात आली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड येथील 'एलसीबी' अर्थातच स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष गुन्हे शोधपथकातील पोलीस अधिकारी, कर्मचारी २५ ऑगस्ट रोजी पेट्रोलिंगवर होते.
दरम्यान, टापरे चौक परिसरात काही संशयित लोक असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास पोलिसांनी कारवाई करत चार जणांना जेरबंद केले. तर चौघे फरार होण्यात यशस्वी झाले. राजेंद्र उर्फ दादा छगन काळे (वय-४८ वर्षे, रा. मस्सा ता. कळंब जि. उस्मानाबाद), संजय उर्फ पिल्या उर्फ भैय्या राजेंद्र तथा दादा काळे (वय-२५ वर्षे, रा. मस्सा ता. कळंब जि. उस्मानाबाद) नितीन भारत डिकले (वय- २८, रा.मस्सा) व प्रदीप बाळासो चौधरी (वय-२७, रा. उरळीकांचन ता. हवेली जि. पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. तर रविंद्र बप्पा काळे, शंकर सुरेश काळे, अनिल रमेश शिंदे (तिघेही रा.मस्सा ता.कळंब जि. उस्मानाबाद) व अरूण बबनराव शिंदे (रा. मोहा ता. कळंब जि. उस्मानाबाद) हे फरार आहेत.
आरोपींकडून धारदार शस्त्र, टॉमी, हातोडी, लोखंडी रॉड, दोर, मिरची पुड, मोबाईल हैंडसेट व दोन चारचाकी वाहने असा एकूण तब्बल १३ लाख ३३हजार ७०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक अनुक्रमे पांडुरंग माने, शिवसांब घेवारे, पोउपनि. दत्तात्रय काळे, हेडकॉन्स्टेबल सुरेश घुगे, मारोती तेलंग, पोलीस नाईक बालाजी तेलंग, विठ्ठल शेळके, पो.कॉ. तानाजी येळगे, मोतीराम पवार,बालाजी यादगीरवाड, वाहनचालक हेमंत बिचकेवार, शेख कलीम यांच्या पथकाने केली.