बिलोली महामार्गावरील चार दुकाने खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:28 AM2018-03-23T00:28:42+5:302018-03-23T11:47:27+5:30
येथील हैदराबाद महामार्गावरील पंचायत समितीच्या बाजूला असलेल्या दुकानांना गुरुवारी पहाटे ४ वाजता आग लागली़ सदरील घटनेत चार दुकानांचा संपूर्ण कोळसा झाला़ अन्य तीन दुकानांचे नुकसान झाले़ पोलीस व तरुणांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले़ यामध्ये एक पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाला़
लोकमत न्यूज नेटवर्क
बिलोली : येथील हैदराबाद महामार्गावरील पंचायत समितीच्या बाजूला असलेल्या दुकानांना गुरुवारी पहाटे ४ वाजता आग लागली़ सदरील घटनेत चार दुकानांचा संपूर्ण कोळसा झाला़ अन्य तीन दुकानांचे नुकसान झाले़ पोलीस व तरुणांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले़ यामध्ये एक पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाला़
तहसील व पंचायत समितीच्या शेजारी साई झेरॉक्स स्टेशनरी, संकेत झेरॉक्स सेंटर, संगमेश्वर झेरॉक्स व संगणक केंद्र, अनिल सूर्यवंशी डीटीपी केंद्र अशी सुशिक्षित बेरोजगारांची दुकाने आहेत़ गुरुवारी पहाटे ४ वाजता साई झेरॉक्समधून आगीचे लोळ निघताना पोलिसांना दिसले़ हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस ठाण्यातून कर्तव्यावर असलेले पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले़ या परिसरातील तरुणांना सोबत घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला़ मात्र आगीने रौद्ररुप धारण केल्याने जवळ जाणे देखील अवघड झाल्याचे सपोनि विजय पंतोजी यांनी सांगितले़ शेजारच्या तीन दुकानातील साहित्य बाहेर काढून दुकाने रिकामे करण्यात आली़ तहसील कॅन्टीन मध्ये असलेले सात गॅस सिलेंडर छताला भगदाड पाडून बाहेर काढण्यात आले़ त्यामुळे मोठा अनर्थ टळला़ दुसऱ्या बाजूला शारद मोरलावार यांचे राघवेंद्र स्टेशनरी स्टोअर्स असून येथे मोठ्या प्रमाणात शासकीय, शैक्षणिक उपयोगी येणारे साहित्य होते़ पोलिसांनी शटर तोडून संपूर्ण साहित्य बाहेर काढले़ मात्र एका आलमारीला आगीची झळ बसली़ साई बोडके, संग्राम हायगले, दत्ता बोडके, अनिल सूर्यवंशी यांच्या दुकानातील एकूण पाच मोठ्या झेरॉक्स मशीन, तीन संगणक, लॅपटॉप, व्हीडीओ शुटींग कॅमेरा, फोटो कॅमेरा, कलर झेरॉक्स मशीन, जनरेटर मशीन, स्कॅनर, झेरॉक्सचे दोन हजार पेपर्स, मुळ शैक्षणिक कागदपत्रे, विविध लग्नाचे २००९ पासूनचा मूळ डाटा, लग्न पत्रिका, बँक पासबुक, चेकबुक, रोख चार हजार रुपये, फोटो, कॅमेरा, इनव्हरर्टर, बॅटरी, फर्निचर असे जवळपास २० लाखांचे नुकसान झाले आहे़
पोलिसांनी देगलूर व धर्माबाद येथील अग्निशामक दलाचे बंब मागविले़ मात्र त्यांना येण्यास विलंब झाला़ सकाळी सहा वाजता दोन्ही वाहने आली़ तब्बल २ तास सुरू असलेल्या आगीत संपूर्ण साहित्य जळून खाक झाले़ कर्तव्यावर असलेले सपोनि विजय पंतोजी, पोनि भगवान धबडगे, कॉन्स्टेबल शेख तौफिक चाँद आदीसह शहरातील मुस्लिम समाजाच्या १० ते १२ तरुणांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले़
दोनच दिवसापूर्वी खरेदी
साई बोडके पोखर्णीकर या तरुणाने लग्न सराईचा हंगाम असल्याने एक लाखाच्या कोºया लग्नपत्रिका २१ मार्च रोजी खरेदी केल्या होत्या़ संपूर्ण गठ्ठे जळून खाक झाले़ तर संग्रमा हायगले यांनी बुधवारीच झेरॉक्स मशीन खरेदी केली होती़ घटनेत मशीनचा कोळसा झाला़ सदरील आग विझवताना चाँद तौफिक शेख या पोलीस कर्मचाºयाच्या हाताला जखम झाली़ बिलोली येथे अग्निशमक दलाची व्यवस्था नसल्याने धर्माबाद, देगलूर येथून वाहने मागविले होते़